आलिया- रणबीरला कन्यारत्नाचा लाभ

बॉलीवूड मधील लोकप्रिय कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना कन्या रत्नाचा लाभ झाला. रविवारी आलियाने रिलायंस फौंडेशन रुग्णालयात एका गोड मुलीला जन्म दिला असून त्यामुळे कपूर- भट्ट खानदानात आनंदाचे वातावरण आहे. आजी नीतू सिंग यांनी रुग्णालयात नातीला पाहिल्यावर पत्रकारांना बाळ बाळंतिणीची तब्येत उत्तम असल्याचे सांगितले. बाळ अजून खूपच छोटे असल्याने आई सारखे आहे कि बाबासारखे हे सांगता येणार नाही असेही नीतू म्हणाली.

आलिया भट्टने बाळाच्या जन्मानंतर सोशल मिडीयावर पहिली पोस्ट केली आहे. आलिया म्हणते,’आमच्या आयुष्यातील बेस्ट न्यूज. आमची मुलगी म्हणजे ‘जादुई बच्ची’ आहे. आम्हाला तिचा अभिमान वाटतो.’ या पोस्ट बरोबर आलियाने सिंहाच्या कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. हाच फोटो तिने प्रेग्नन्सीची बातमी देताना शेअर केला होता. रणबीर आलियाचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छ्यांचा वर्षाव करत आहेत.

आलिया आणि रणबीर २०१८ पासून डेटिंग करत होते. त्यांचा विवाह १४ एप्रिल २०२२ रोजी झाला होता. आलिया मुलीचे नाव काय ठेवणार याचे अंदाज बांधले जात आहेत. एका  डान्स रियालिटी शो मध्ये आलियाने मनातले बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. एका लहान मुलीला तिने नावाचे स्पेलिंग विचारले तेव्हा त्या मुलीने एएलएमएए असे स्पेलिंग केले त्याचा उच्चार आलमा असा होतो. आलियाने हे नाव खूपच छान आहे आणि मला मुलगी झाली तर तिचे नाव आलमा ठेवेन असे म्हटले होते.