शिंदे यांना मुख्यमंत्रीपद हा धक्का नव्हता पण…

मुंबई: शिवसेनेत फूट पडल्यानंतर सत्ता हस्तगत करताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले हा माझ्यासाठी धक्का नव्हता. मात्र, उपमुख्यमंत्री पदासाठी माझी निवड हा माझ्यासाठी मोठा धक्का होता, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

एका वृत्तसमूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात फडणवीस यांनी शिंदे गटाबरोबर राज्याची सत्ता हस्तगत करण्याच्या काळातील आठवणींना उजाळा दिला.

शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाल्यावर त्यांच्याशी संधान बांधताना मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय माझ्याशी चर्चा करून घेण्यात आला. खरंतर हा मूळ प्रस्ताव माझाच होता. त्यामुळे मला या निर्णयाने अजिबात धक्का बसला नाही. मात्र, मला उपमुख्यमंत्रीपद घेण्यास सांगणे, हे धक्कादायक होते. मला या सरकारमध्ये कोणतेही पद नको होते. तरीही प्रशासनातील अनुभव असल्याने मी हे पद स्वीकारावे, हे पक्षाकडून सांगण्यात आले, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेत भारतीय जनता पक्षाने फूट पाडली नाही. मात्र, शिंदे आणि सहकाऱ्यांना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरे यांच्याकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे बाहेर पडायचे होते तेव्हा आम्ही त्यांना परत जायला सांगायचे होते का? आम्ही अर्थातच त्यांचे स्वागत केले, असे फडणवीस यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार पाडून शिंदे गटाकडून राज्याची सत्ता हस्तगत करणे हा विश्वासघात नव्हता. उलट शिवसेनेकडून करण्यात आलेल्या विश्वासघाताचा सूड होता, असा दावा फडणवीस यांनी केला. विधानसभा निवडणुका भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढले. या युतीने प्रचंड बहुमत प्राप्त केले. तरीही शिवसेनेने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता मिळवली. त्यांनी त्यावेळी केलेल्या विश्वासघाताची फळे ते भोगत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपले सूर उत्तम प्रकारे जुळले आहेत. शिंदे हे आपल्याला कधीही दुय्यम वागणूक देत नाहीत. उपमुख्यमंत्री असल्याची जाणीव करून देत नाहीत. प्रत्येक निर्णय घेताना माझ्याशी चर्चा करून घेतला जातो, असेही फडणवीस म्हणाले. यापुढील काळात येणाऱ्या निवडणुका भाजप आणि शिंदे गट युती म्हणून लढवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.