स्वतंत्र भारताचे पहिले मतदार नेगी यांचे १०६ व्या वर्षी निधन

शाम सरण नेगी हे स्वतंत्र भारतातले पहिले मतदार. वयाच्या १०६ व्या वर्षी, शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे मृत्युपूर्वी दोनच दिवस त्यांनी हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत अखेरचे मतदान केले होते. हे मत त्यांनी पोस्टाने पाठविले होते. किन्नोरचे डीसी अबीद हुसेन यांनी नेगी यांच्या निधन वृत्तास दुजोरा दिला आहे. ते म्हणाले नेगी यांच्यावर त्यांच्या गावी, कल्पा येथे सन्मानाने अंत्यसंस्कार केले जात आहेत.

१९५१-५२ च्या निवडणुकीत नेगी यांनी देशात सर्वात अगोदर पहिले मतदान केले होते त्यावेळी ते ३३ वर्षाचे होते. त्यानंतर त्यांनी ३४ वेळा मतदान केले आणि कुठल्याच निवडणुकीत मतदान कधीच चुकविले नाही. १ जुलै १९१७ ला जन्मलेले नेगी शिक्षक होते. त्यांना निवृत्त होऊन ५१ वर्षे झाली होती. भारतात पहिली निवडणूक १९५२ साली झाली पण हिमाचल प्रदेशाच्या दुर्गम भागात खराब हवामानामुळे पाच महिने अगोदरच मतदान घेतले गेले होते. २३ ऑक्टोबर १९५१ रोजी झालेल्या या मतदानात नेगी यानाही निवडणूक ड्युटी बजावायची होती आणि त्यांचे ड्युटीचे ठिकाण गावापासून दूर असल्याने नेगी यांनी सकाळी ७ वा. आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर देशात सर्वप्रथम मतदान करणारे म्हणून नेगी यांची ओळख निर्माण झाली होती.

नेगी यांच्या निधनावर हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.