मुकेश अंबानींच्या रिलायंस रिटेलचा सलून व्यवसायात प्रवेश

मुकेश अंबानी यांच्या रिलायंस उद्योगसमूहातील एक, रिलायंस रिटेल, सलून व्यवसायात प्रवेश करत आहे. चेन्नईच्या ‘नॅचरल सलून अँड स्पा’ मध्ये रिलायंस रिटेल ४९ टक्के भागीदारी हिस्सा खरेदी करत असून त्या संदर्भातील बोलणी आता अंतिम टप्प्यात आहेत. नॅचरल सलून अँड स्पा’चे सीईओ सी.के.कुमारवेल म्हणाले रिलायंस रिटेलच्या गुंतवणुकीमुळे आमचा व्यवसाय वाढायला मदत होणार आहे. कंपनीची सध्या २० राज्यात ७०० सलुन्स आहेत. रिलायंस रिटेलच्या गुंतवणुकीमुळे पाचपट नवीन सलून उघडण्यास मदत होणार आहे. कंपनीच्या वेबसाईटनुसार कंपनी देशात २०२५ पर्यंत ३ हजार सलून्स खोलणार आहे.

मिडिया रिपोर्ट नुसार भारतात सलून व्यवसायाची उलाढाल २० हजार कोटींची आहे. त्यामुळे या उद्योगात ६५ लाख रोजगार उपलब्ध झाले आहेत. करोना काळात या उद्योगाला सुद्धा प्रचंड नुकसान सोसावे लागले मात्र आता नव्याने उद्योग पुन्हा जोमाने सुरु झाला आहे. नॅचरल सलून अँड स्पा’ भारतात लॅक्मे, एनरिक, हिंदुस्तान युनीलिव्हर सह अनेक ब्रांडशी टक्कर देत आहे. रिलायंस रिटेल च्या गुंतवणुकीमुळे नॅचरल सलून अँड स्पा’ व्यापारात तेजी येणार असून देशाच्या अनेक भागात सेवा विस्तार करणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे.