पंचूर- योगी आदित्यनाथ यांचे सुंदर गाव

पर्यटनासाठी अनेक भटके हिमाचलला पसंती देतात तर अनेक उत्तराखंड मध्ये भटकंती करण्यास उत्सुक असतात. या भागात लोकप्रिय पर्यटन स्थळे सोडली तर अनेक सुंदर ठिकाणे अजूनही दुर्लक्षित राहिली आहेत. त्यातील एक आहे पंचूर गाव. अतिशय दुर्गम भागातील हे गाव आता प्रसिद्धीच्या प्रकाशात आले आहे कारण हे गाव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गाव आहे.

पौडी, यमकेश्वर ब्लॉक मध्ये ऋषिकेश पासून नीलकंठ मंदिर रस्त्याने जाताना एक रस्ता यमकेश्वरला जातो. याच रस्यावर पंचूर वसलेले आहे. या रस्त्यावर एकही रिसोर्ट नाही, गर्दी नाही. शांत सुंदर निसर्ग आणि मस्त स्वच्छ हवा अनुभवण्यासाठी येथे गेले पाहिजे. नल्तुरा पासून साधारण दीड तासाच्या अंतरावर पंचूर लागते.

हे गाव म्हणजे छोटय छोट्या घरांची एक वाडी अश्या प्रकारे वसलेले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या वाडीमध्ये त्यांच्याच परिवारातील लोकांची घरे आहेत. योगी यांचा परिवार आजही येथे राहतो पण त्यांना भेटण्याची परवानगी नाही. योगींची शाळा येथे पाहता येते. आदित्यनाथ यांचे ६,७,८ वी पर्यंतचे शिक्षण याच शाळेत झाले आहे.

या गावातून परत जाताना यमकेश्वर मंदिराला भेट देता येते. महामृत्युंजय जपाचा उगम याच मंदिरात झाला असे मानतात. येथेच महादेवाने एका बालकाचा अकाली मृत्यू टाळला आणि यमराजाला जेथे माझी पूजा होते तेथे यायचे नाही असा आदेश दिल्याची कथा सांगतात.