लंडन ट्यूब रेल्वे स्टेशनवर पंतप्रधान सुनक यांची फुले विक्री

ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांना गुरुवारी सेन्ट्रल लंडन वेस्टमिन्स्टर ट्यूब स्टेशनवर पॉपी (अफूची फुले) विकताना पाहून सर्वसामान्य प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला पण त्याच वेळी अनेक प्रवाशांनी सुनक यांच्याशी बोलण्याची, त्यांच्या सोबत सेल्फी काढून घेण्याची संधीही साधली. गुरुवारी सकाळी ८ वा. रॉयल ब्रिटीश लिजनच्या वार्षिक पॉपी अपील कार्यक्रमात सुनक यांनी फुले विकून सेनेच्या मदतनिधी साठी काम केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मिडीयाला आमंत्रण नव्हते. स्टेशन वरील प्रवाशांनीच सोशल मिडीयावर हे फोटो शेअर केले. सेनेतील अनेक कर्मचारी, सिव्हील सेवक स्टीफन ले रॉक्स या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

ब्रिटन अर्थव्यवस्था सध्या मंदीच्या विळख्यात सापडली आहे. महागाई प्रचंड वाढली आहे आणि राजकीय वातावरण अस्थिर आहे. अश्या काळात नव्या पंतप्रधानांना मोठी आव्हाने पेलावी लागणार आहेत. असे असतानाही पंतप्रधान सुनक यांची ही वर्तणूक नागरिकांना सुखावून गेली आहे. देशाचा टॉप लीडर फुले विकताना पाहून नागरिक प्रथम हैराण झाले मात्र त्यानंतर अनेकांनी जमिनीवर पाय असलेले नेते असे सुनक यांचे कौतुक केले.

ब्रिटन सैनिक स्मृती व सन्मान म्हणून पॉपीची फुले घालण्याची प्रथा जुनी आहे. सैनिक कल्याण निधी गोळा करताना कागदाची पॉपी फुले करून ती विकली जातात. दरवर्षी हा कार्यक्रम होतो. यंदा पंतप्रधान सुनक यांनी फंडरायझर म्हणून ५ पौंडाना एक अश्या किमतीला ही फुले विकली. ब्रिटीश सेना, नौसेना आणि वायुसेना स्वयंसेवक घरोघरी जाणून सैनिक कल्याण निधीसाठी देणग्या गोळा करत आहेत.