आमदार, खासदारांच्या नातेवाईकांना मिळणार नाही भाजपची उमेदवारी

गांधीनगर: डिसेंबर महिन्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाचे आमदार किंवा खासदार यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली जाणार नाही, असा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवारी निश्चित करण्यासाठी गुजरात भाजप संसदीय समितीची बैठक तीन दिवसांपासून सुरू आहे. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भडोच येथील भाजप खासदार मनसुख वसावा यांच्या कन्येने पक्षाकडे विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना याच धोरणानुसार उमेदवारी नाकारण्यात आली.

स्वतः खासदार वसावा यांनीच ही माहिती टविता करून दिली आहे. आमदार, खासदारांना तिकीट न देण्याच्या पक्षाच्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे. पक्ष जो उमेदवार देईल, त्याच्या विजयासाठी पूर्ण प्रयत्न करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

गुजरात विधानसभेत एकूण १८२ जागा आहेत. विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होणार आहे. निकाल ८ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येतील.