… तरीही आजादी मार्च थांबणार नाही: इम्रान खान

इस्लामाबाद: आपल्यावर जीवघेणा हल्ला झाला असला तरी मान झुकवणार नाही. सार्वत्रिक निवडणूक जाहीर होईपर्यंत आजादीं मार्च थांबणार नाही, असा इशारा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे.

निवडणूक घेण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्यावर दबाव वाढविण्याच्या दृष्टीने खान यांच्या पाकिस्तान तहरिक ए इन्साफ या पक्षाने देशव्यापी निषेध यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेदरम्यान हल्लेखोरांनी वजिराबाद येथे खान यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या पायाला गोळी लागली आहे.

या हल्याचे सूत्रधार स्वतः पंतप्रधान शाहबाझ शरीफ, त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री राणा सनाउल्लाह खान आणि सैन्याचे वरिष्ठ अधिकारी असल्याचा आरोप इम्रान खान यांनी हल्ला झाल्यानंतर केला होता. एप्रिल महिन्यात आपल्यावर अविश्वास ठराव आणून आपल्याला पंतप्रधान पदावरून हटविण्याचा कट देखील शाहबाझ शरीफ यांनी केल्याचा खान यांचा आरोप आहे.

निषेध यात्रा सुरू ठेवण्याबाबत खान पक्षाच्या पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा करणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत जनतेला त्यांचे हक्क मिळवून निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही, असे खान यांचे निकटवर्तीय आणि फैजल जावेद खान आणि माजी मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले.