गुजराथ निवडणुका, सट्टा बाजारात भाजपवर मोठा सट्टा

गुजराथ विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. १ आणि पाच डिसेंबर अश्या दोन टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. या घोषणेबरोबर सट्टा बाजारात जोरदार हालचाली सुरु झाल्या असून सट्टेबाज या वेळीही भाजपच्याच बाजूने कौल जाईल असा अंदाज व्यक्त करत आहेत. त्यासाठी अनेक कारणे दिली जात आहेत. सट्टेबाजांच्या अंदाजानुसार हिमाचल प्रदेशात सुद्धा पुन्हा भाजपलाच सत्ता मिळण्याची शक्यता अधिक आहे. तेथे १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

सटोडियांच्या अंदाजानुसार यंदा भाजप १८२ जागांपैकी किमान १२० जागा मिळवेल. दोन दशकात या सीट्स सर्वाधिक आहेत. विशेष म्हणजे याच वेळी केल्या गेलेल्या काही सर्व्हेक्षणातून सुद्धा भाजपला १२५-१३० जागा दाखविल्या जात आहेत. आगामी काळात सट्टा बाजारात ४० ते ५० हजार कोटींचे अवैध व्यवहार होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सट्टेबाजाच्या म्हणण्यानुसार २००२ मध्ये मोदींनी प्रथम १८२ पैकी १२७ जागांवर विजय मिळविला होता. २०१७ मध्ये पटेल आरक्षण मागणी आंदोलनामुळे भाजपला ९९ जागांवर समाधान मानावे लागले होते. पण आंदोलन प्रमुख हार्दिक पटेल आता भाजप मध्ये गेल्याने पटेल समुदाय भाजपच्या पाठीशी उभा राहील. त्याचवेळी कॉंग्रेसचे नेते आणि गांधी परिवाराचे विश्वासू अहमद पटेल यांचे निधन झाले असल्याने कॉंग्रेसला अडचण आहे. कॉंग्रेस १५ ते ३० जागा जिंकू शकेल असा अंदाज व्यक्त होत आहे. राज्यात आम आदमी पक्षाचे मजबूत नेतृत्व नाही त्यामुळे तो पक्ष १० ते २० जागा मिळवेल असे अंदाज आहेत.