एलोन मस्क यांची ट्विटर खरेदीनंतर जेट विमान खरेदी

एलोन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सना ट्विटर खरेदी केल्यानंतर लगोलग आणखी एक महागडी खरेदी केली आहे. बिझिनेस इनसाईडरच्या वृत्तानुसार मस्क यांनी गल्फ स्ट्रीम ४७०० या लग्झरी खासगी जेट विमानाची खरेदी केली असून त्यासाठी ६ अब्ज ४६ कोटी रुपये मोजले आहेत. टेस्ला आणि स्पेस एक्सचे मालक मस्क यांना अलिशान विमान खरेदीचा शौक आहे. त्यांच्या ताफ्यात अगोदरच ५ लग्झरी विमाने आहेत.

गल्फ स्ट्रीम ४७०० हे नवीन अत्याधुनिक खासगी जेट ऑक्टोबर २०१९ मध्ये लाँच केले गेले आहे. लग्झरी विमान खरेदीचा शौक असला तरी मस्क बहुतेक वेळचा प्रवास नेहमी जी ६५ ओईआरजेट या विमानाने करतात असे सांगितले जाते. त्यांनी या विमानाने आत्तापर्यंत दीड लाख मैल प्रवास केला आहे. नव्या विमानाची डिलिव्हरी मस्क यांना जानेवारी २०२३ मध्ये मिळणार आहे. मस्क यांनी डोसॉल्ट ९०० बी हे खासगी विमान सर्वप्रथम खरेदी केले होते.

गल्फ स्ट्रीम त्याच्या नव्या खासियती मुळे आणि खास सुविधांमुळे सध्या चर्चेत आहे. त्याच्या उड्डाणासाठी येणारा खर्च प्रचंड आहे. लिबर्टी जेटच्या रिपोर्ट नुसार गल्फ स्ट्रीम जेटच्या ४०० तासांच्या उड्डाणासाठी ३५ लाख डॉलर्स खर्च येतो. या विमानात १९ प्रवाशांना प्रवास करता येतो. येथे खास स्युटस आणि डायनिंग एरिया दिला गेला आहे. विमानाची लांबी १०९ फूट १० इंच आणि उंची २५ फुट ५ इंच आहे. या विमानाचा वेग ताशी ७५०० समुद्री मैल आहे. जॉर्जिया जिनेव्हा हे अंतर ७ तास ३७ मिनिटात हे विमान पार करते. या विमानाला २० खिडक्या असून वायफाय सुविधा आहे.