मेस्सी बायजुसचा पहिला जागतिक सदिच्छादूत

पॅरीस: करोडो फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातला ताईत असलेल्या लिओनेल मेस्सी याला बायजूस या शालेय शिक्षण देणाऱ्या ॲपने आपला पहिला जागतिक सदिच्छादूत म्हणून करारबद्ध केले आहे. सर्वांना दर्जेदार शिक्षणाच्या समान संधी, या तत्त्वाचा प्रसार करण्यासाठी हा करार करण्यात आल्याचे बायाजुसने नमूद केले आहे.

जगभराच्या विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठण्यासाठी आणि त्या स्थानावर टिकून राहण्यासाठी प्रेरणा देण्यात मला यश मिळेल, असा विश्वास अर्जेंटिना फुटबॉल संघाचा कर्णधार मेस्सी याने व्यक्त केला. सर्वांना शिक्षण उपलब्ध व्हावे, विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये गोडी निर्माण व्हावी, हे बायाजुसचे उद्दिष्ट आहे. ते आपल्या तत्वांशी सुसंगत असल्यानेच हा करार केल्याचे त्याने स्पष्ट केले.

मेस्सी याची स्वतः ची लिओनेल मेस्सी फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था आहे. मुलांना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी समान संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मेस्सीने या संस्थेची स्थापना सन २००७ मध्ये केली आहे.