या जेल मध्ये आनंदाने मुक्कामासाठी जातात माणसे

उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यातील एक तुरुंग विशेष चर्चेत आला आहे. हल्दानी जेल असे त्यांचे नाव असून येथे माणसे अगदी आनंदाने मुक्काम करतात. त्यातही एका खास प्रकारची माणसे येथे आवर्जून एक रात्र काढण्यासाठी येतात. या तुरुंगाची हकीकत त्यामुळे अधिक रोचक बनली आहे.

हा तुरुंग १९०३ साली बांधला गेला म्हणजे तो १०० वर्षाहून अधिक जुना आहे. येथील सहा स्टाफ क्वार्टर्स आणि जुने शस्त्रागार गेली अनेक वर्षे वापरात नाही. काही सिनियर तुरुंग अधिकारी काही जणांना येथे राहण्याची परवानगी देत असत. त्यामुळे एका अधीक्षकाला या ठिकाणी जेल पर्यटन सुरु करण्याची कल्पना सुचली. मग त्यांनी तसा प्रस्ताव सादर केला. ऐकायला विचित्र वाटेल पण काही खास लोकांना किमान एक रात्रीचा मुक्काम तुरुंगात करायची गरज जाणवत होती आणि त्यातून हे पर्यटन सुरु झाले.

येथे गेस्ट साठी कैद्यांचे कपडे आणि कैद्याना दिले जाणारे जेवण दिले जाते. येथे येणाऱ्या पर्यटकात जास्त गर्दी असते ज्यांच्या जन्मपत्रिकेत तुरुंगवारीचा योग आहे त्यांची. असे समजते कि अनेकांच्या पत्रिकेत तुरुंगवारीचा योग असतो. त्यांना ज्योतिषी एक दिवस जेल मध्ये राहण्याचा सल्ला देतात. या जेलच्या आत एक डमी जेल आहे. ५०० रूपये भरले कि येथे एक दिवस आणि रात्र मुक्काम करता येतो. अशी सुविधा देणारा देशातील हा एकमेव तुरुंग आहे.

या संदर्भात ज्योतिषी सांगतात, ज्याच्या पत्रिकेत शनी मंगळ यांच्यासह अन्य ३ ग्रह एका स्थानी आहेत त्यांना कारावास भोगावा लागतो. अश्यांना सर्वसाधारणपणे एक दिवस तुरुंगात काढा असा सल्ला दिला जातो. त्यामुळे पत्रिकेतील ग्रहांच्या वाईट परिणामापासून बचाव होऊ शकतो असे मानले जाते.