मान मोडून काम करा, अन्यथा चंबूगबाळे आवरा, मस्क यांचे नवे धोरण

ट्विटरची मालकी मिळविल्यावर स्पेस एक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून ट्विटरचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. याची चर्चा अजून शमली नसतानाच कंपनीच्या कर्मचाऱ्याना सुद्धा मान मोडून काम करा, अन्यथा चंबूगबाळे आवरा असा संदेश दिला गेल्याचे वृत्त आले आहे.

मस्क यांनी सूत्रे हाती घेताच नोव्हेंबर मध्ये सुरवातीलाच इंजिनिअर्स सह अन्य कर्मचार्यांना समय सीमा घालून दिली आहे. त्यामुळे आठवड्याचे साती दिवस १२ तास काम करून दिलेला टास्क पूर्ण केला जावा असा इशारा दिला गेला आहे. ‘करियर मेक या ब्रेक’ अशी यांची संभावना केली गेली आहे. याचा अर्थ जे कुणी हे आव्हान पेलू शकणार नाहीत त्यांना सरळ घराचा रस्ता धरावा लागणार आहे. मस्क यांनी ५० टक्के कर्मचारी कपात करण्याची धमकी सुद्धा दिल्याचे समजते.

जादा कामाबद्दल ओव्हर टाईम, कॉम्प टाईम, नोकरी सुरक्षा याबाबत काहीही चर्चा केली गेलेली नाही. मात्र मस्क यांनी कंपनीत सुधारणा होणार असून त्यात बोलण्याचे स्वातंत्र, सर्वांसाठी अधिक सुलभ योजना येतील असे सांगितले आहे.