‘कू’ स्वदेशी अॅप, डाऊनलोड आकडा पाच कोटी पार

‘कु’ या स्वदेशी सोशल मिडिया अॅप ने पाच कोटी डाऊनलोड आकडा पार केला असून हा आमच्या व्यवसायात मैलाचा दगड आहे असे सीईओ अप्रमेय राधाकृष्ण यांनी सांगितले. ते म्हणाले, या बहुभाषी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ने या वर्षात हा टप्पा गाठला यामुळे आमचा उत्साह वाढला आहे. जानेवारी पासून आत्तापर्यंत युजर्स व अॅप वर दिल्या गेलेल्या सुविधा यात जबरदस्त वाढ झाली आहे. गेले काही महिने इन्स्टॉलेशन व या अॅप वर अधिक वेळ घालविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. देशी भाषेत डिजिटल स्वरुपात सर्वाना एकत्र येण्याची संधी मिळते आहे.

अप्रमेय पुढे म्हणाले, ‘सबसे पहले भारत’ याच ध्येयाने या बहुभाषी नेटवर्कवर युजर्स त्यांचे विचार, भावना एकमेकांशी शेअर करू शकतात, अनेक भाषा बोलणाऱ्या भारतीयांना यात सामील होता येत आहे आणि त्यामुळे त्यांचे समाधान होत आहे याची पावतीच आम्हाला या वाढीतून मिळाली आहे. सध्या हिंदी, मराठी, गुजराथी, पंजाब, कन्नड, तमिळ, तेलगु, आसामी, बंगाली व इंग्रजी अश्या १० भाषांत आहे.

७५०० पेक्षा अधिक प्रसिध्द व्यक्ती, लाखो विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक, कवी, लेखक, पत्रकार, अभिनेते ‘कु’ वापरत आहेत आणि सणावारी आपल्या संस्कृतीचा समृध्द वारसा, आपला आनंद, मंचावर त्यांच्या त्यांच्या मातृभाषेत व्यक्त करत आहेत. यातून विविध भाषा बोलणाऱ्या ९० टक्के भारतीयांची एकजूट केली गेली असून आम्हाला त्याचा गर्व वाटतो असेही अप्रमेय म्हणाले. ‘कु’ मध्ये लवकरच नवीन फीचर्स जोडली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.