एकदाच उड्डाण केलेल्या महाकाय विमानाची पंच्याहत्तरी

मोठ्या कष्टाने तयार केलेले पण फक्त एकाच उड्डाण करून आता पडून राहिलेले एक खास विमान आणि त्याची कथा मोठी रोचक आहे. जगातले हे महाकाय विमान ‘ह्युजेस हर्क्युलस ४’ त्याच्या ‘स्पृस गूज’ या लोकप्रिय नावाने प्रसिद्ध आहे. जागतिक युद्धात मालवाहतुकीसाठी आणि सैन्य वाहतुकीसाठी ते बनविले जात होते. पण ते पूर्ण तयार होईपर्यंत महायुद्ध संपले त्यामुळे हे विमान नंतर कधीही वापरले गेले नाही. आपल्या विशालकाय आकाराने त्याने इतिहासात जागा मिळविली पण जगाने मात्र त्याला कचऱ्यात जमा केले.

या विमानाची पहिली आणि शेवटची फ्लाईट झाली त्याला आता ७५ वर्षे पूर्ण झाली. ३२० फुट ११ इंच लांबीचे त्याचे पंख आहेत. सर्वसाधारण विमानांना २ ते ४ इंजिन असतात, या विमानाला आठ इंजिन्स आहेत. या विमानाचे वजन १,८१,४३६ किलो असून कोणत्याही विमानापेक्षा कितीतरी अधिक सामान वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. त्याचा ताशी वेग ४०० किलोमीटर असून एका वेळी ते ४८०० किलोमीटर प्रवास करू शकत होते. ३ कृ मेम्बर्स सह ७५० प्रवासी वाहून नेण्याची त्याची क्षमता होती.

१९४२ मध्ये अमेरिकन नौसेनेच्या बोटीना जर्मन ‘यु बोटी’ हैराण करत होत्या आणि अमेरिकेची जहाजे अटलांटिक महासागरात जलसमाधी घेत होती. तेव्हा युरोप मध्ये सैनिक आणि सामग्री हवाई मार्गे पाठविण्यासाठी या विमानची निर्मिती सुरु केली गेली. हार्वर्ड ह्युजेस याने या विमानाचे डिझाईन केले. त्यात अल्युमिनियम ऐवजी प्लायवूड आणि फॅब्रिकच्या संयोगातून तयार केलेले लाकूड वापरले गेले. पण विमान तयार होई पर्यंत युद्ध संपले आणि सैन्याला या विमानची गरज राहिली नाही. हे विमान बनविण्यासाठी त्याकाळी २३ दशलक्ष डॉलर्स म्हणजे आजच्या हिशोबाने ३०६ दशलक्ष डॉलर्स खर्च आला होता. १९४५ मध्ये युध्द संपले आणि १९४७ मध्ये हे विमान तयार झाले.

२ नोव्हेंबर १९४७ मध्ये पाण्यात नेऊन या विमानची अंडरवॉटर टॅक्सी टेस्ट केली गेली आणि फायनल टेस्ट म्हणून फक्त ३६ सेकंदाचे उड्डाण झाले. तेच त्याचे पहिले व शेवटचे उड्डाण. आजही हे विमान चांगल्या स्थितीत आहे. ओरेगनच्या अॅव्हीएशन अँड स्पेस म्युझियम मध्ये ते ठेवले गेले आहे.