असे आहेत प्रहार जनशक्तीचे नेते, आमदार बच्चू कडू

अमराववतीचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यातील झक्काझक्की आता संपल्याचे जाहीर झाले असले तरी त्यामुळे पुन्हा एकदा बच्चू कडू चर्चेत आले आहेत. ‘सत्ता गेली चुलीत, ३५० केसेस अंगावर आहेत, आम्ही कुणाला घाबरत नाही, पुन्हा असा प्रकार घडला तर प्रहारचा दणका देऊ’ अशी गर्जना बच्चू कडू यांनी केली आहे. २८८ आमदारांच्या महाराष्ट्र विधानसभेतील बच्चू कडू अपक्ष आमदार आहेत आणि सलग चौथ्या वेळी निवडून आले आहेत. उद्धव सरकार मध्ये पाच विविध खाती सांभाळणारे कडू, एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यावर त्यांच्या सोबत गेले आहेत.

कसे आहेत नेमके हे आमदार? विद्यार्थी संघटनेतून राजकारणात आलेले बच्चू कडू त्यांच्या हटके वर्तनाने नेहमीच चर्चेत येतात. लेखी अर्ज, धरणे, निदर्शने, उपोषणाच्या उपयोग होत नाही तेव्हा ते स्वतःचा खास ढंग अमलात आणतात. त्या संदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. तहसील कार्यालयाला कुलूप लावून कर्मचार्यांना आत कोंडणे, अपंगाना न्याय मिळत नाही म्हणून स्वतःच्या हाताला महिना महिना प्लास्टर करून घेणे, शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन गेल्यावर सरकारी अधिकारी जागेवर नाहीत म्हणून त्यांच्या खुर्च्यांचा सार्वजनिक लिलाव करून ते पैसे सरकर जमा करणे अश्या अनेक कारणांनी ते जनतेत लोकप्रिय आहेत.

याचबरोबर अधिकाऱ्यांना मारहाण, खडाजंगी, अधिकारी वर्गाशी वाईट वर्तन यामुळे बदनाम सुद्धा आहेत. मात्र बच्चू कडू या कशाचीच पर्वा करत नाहीत. आजपर्यंत ७० ते ७५ हजार लोकांना त्यांनी मोफत उपचाराचा लाभ दिला आहे. शेकडो वेळा रक्तदान केले आहे.

त्यांच्या मतदारसंघाला रुग्णवाहिका हवी होती. तेव्हा आमदाराला त्यांच्या मतदारसंघात फिरण्यासाठी विना व्याज गाडी विकत घेता येते या सवलतीचा फायदा घेऊन त्यांनी कार विकत घेतली आणि नंतर कार विकून त्या पैश्यातून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याचे सांगतात. वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेले कडू सांगतात, त्यांचे नाते वेदनेशी आहे. जेथे वेदना दिसते तेथे त्यांच्यातील कार्यकर्ता जागा होतो. मग आपल्यावर केस होईल किंवा आमदारकी जाईल याची फिकीर ते करत नाहीत.