भारत आणि बांगलादेश यांच्यात बुधवारी अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकाच्या सुपर 12 सामन्यात (IND vs BAN) रोहित शर्मा आणि कंपनीने DLS पद्धतीनुसार 5 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बांगलादेशचा संघ मैदानात उतरला होता पण पावसाचा व्यत्यय आला. त्यानंतर बांगलादेशला विजयासाठी 16 षटकांत 151 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. त्याला 6 विकेट्स गमावून केवळ 145 धावा करता आल्या. लिटन दासने 60 धावांची शानदार खेळी खेळली, त्याला नजमुल हुसेन शांतो (21 धावा) नेही चांगली साथ दिली. मात्र, बांगलादेशचा अन्य कोणताही खेळाडू क्रीजवर टिकू शकला नाही आणि ही गोष्ट भारतासाठी वरदान ठरली. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी दोन गडी बाद केले. नाबाद 64 धावांच्या स्फोटक खेळीसाठी विराट कोहलीला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले.
