डिजिटल रुपया आणि क्रीप्टो करन्सीमध्ये हा आहे फरक

१ नोव्हेंबर पासून रिझर्व्ह बँकेने डिजिटल रुपयाचे प्रायोगिक पातळीवर चलन सुरु केले आहे. सेन्ट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे सीबीडीसी ही डिजिटल स्वरूपातील केंद्रीय बँकेची वैध मुद्रा आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर रिझर्व बँकेने जारी केलेल्या नोटाच डिजिटल फॉर्म मध्ये आहेत. सध्या होलसेल सेग्मेंट साठी हा प्रयोग सुरु झाला आहे. एक रूपयाच्या कागदी नोटेइतकेच डिजिटल रुपयाचे मूल्य आहे आणि त्याच स्वरुपात त्याचे व्यवहार होणार आहेत. फक्त हे ट्रान्झॅक्शन कॅशलेस आहे.

डिजिटल करन्सीचे भारतात दोन प्रकार आहेत. रिटेल सीबीडीसी आणि होलसेल सीबीडीसी. रिटेल सीबीडीसी सर्वांसाठी उपलब्ध केली जाणार आहे तर होलसेल निवडक अर्थ किंवा वित्तीय संस्थांसाठी उपलब्ध असणार आहे. या करन्सी चे अनेक फायदे आहेत. याच्या वापरामुळे रोखीवरील निर्भरता कमी होणार आहे. शिवाय अधिक मजबूत, कुशल, विश्वसनीय व वैध देवघेव पर्याय मिळणार आहे. रोख रक्कम बाळगण्याची गरज भासणार नाही. ही करन्सी मोबाईल वॉलेट मध्ये ठेवता येणार आहे. बँकेतून त्याबदली सहज कॅश मिळू शकणार आहे.

या मुळे सरकारला सर्व अधिकृत नेटवर्क मधून होणाऱ्या देवघेवीची माहिती मिळेल तसेच देशातून बाहेर जाणारा आणि देशात बाहेरून येणाऱ्या पैशावर नियंत्रण येणार आहे. बनावट नोटांपासून सुटका मिळणार आहे. तसेच कागदी नोटा प्रिंटींग यासाठी येणारा खर्च कमी होईल. ही डिजिटल करन्सी खराब होणार नाही तर ती कायम स्वरूपी असेल. ब्लॉकचेनवर आधारित असल्याने ती सुरक्षित आहे.

क्रीप्टो करन्सी आणि डिजिटल करन्सी मध्ये काही फरक आहेत. क्रिप्टो करन्सी खासगी असून तिला वैधता नाही. त्यावर कोणत्याच सरकारचे नियंत्रण नाही. केंद्रीय बँकेचा त्यावर कंट्रोल नाही. डिजिटल करन्सी सरकारमान्य आहे. क्रीप्टो करन्सीच्या रेटमध्ये चढउतार होतात तसे डिजिटल करन्सी मध्ये होत नाहीत.