जगभरात अनेक देशांनी दणकून केली सोने खरेदी

सप्टेंबर तिमाही केंद्रीय बँक अहवालात अनेक देशांनी दणकून सोने खरेदी केल्याचे नमूद केले गेले आहे. १९६७ नंतरची ही सर्वाधिक सोने खरेदी असून सोन्याच्या दरात झालेल्या घटीचा तसेच दीर्घकाळ सोने दर स्थिर राहिल्याचा फायदा देशोदेशीच्या केंद्रीय बँकांनी घेतला आहे. यंदा सोने खरेदीचे ५५ वर्षांचे रेकॉर्ड मोडले गेले असून यावेळी केंद्रीय बँकांनी ४०० टन सोने खरेदी केली आहे.

या सोने खरेदीत तुर्कस्थान आघाडीवर असून त्यानंतर उझबेकिस्तान, कतार यांचा नंबर आहे. काही देशांनी किती सोने खरेदी केले त्याची माहिती उघड केलेली नाही.त्यात चीन आणि रशिया यांचा समावेश आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी सेन्ट्रल बँकांनी ६७३ टन सोने खरेदी केली आहे त्यात चीन आणि रशियाचा वाटा मोठा आहे.

यापूर्वी २०१८ मध्ये २४१ टन सोने खरेदी केली गेली होती त्यात तुर्कस्तानने ३१ टन सोने खरेदी केले होते. यावर्षी त्यांनी ९५ टन सोने खरेदी केले आहे. भारताच्या रिझर्व्ह बँकेने जुलै मध्ये १३ टन तर सप्टेंबर मध्ये ४ टन सोने खरेदी केले आहे. भारताचा सुवर्ण साठा ७८५ टन झाला आहे. डॉलरचे भाव वाढल्याने सोने दर कमी होत आहेत त्यामुळे जगभर सोन्याची मागणी वाढली आहे. रशियाने अन्य देशात सुद्धा त्यांचे सोने ठेवलेले आहे. यंदा तिसऱ्या तिमाहीत ११८१ टन एकूण सोने खरेदी केली गेली असून त्यात भारतीय शहरांचे योगदान मोठे आहे. भारतात ग्राहकांच्या सोने मागणीत १७ टक्के वाढ झाली असून दागिने खरेदीचे प्रमाण २० टक्के वाढले आहे.