अमेरिकेत पुन्हा ट्रम्प सरकार?

अमेरिकेत नोव्हेंबर मध्ये होऊ घातलेल्या मध्यावधी निवडणुकासाठी केल्या गेलेल्या सर्व्हेक्षणाचे निकाल धक्कादायक असून त्यानुसार अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार येण्याची शक्यता दिसून आली आहे. यामुळे बायडेन सरकारची चिंता वाढली आहे. सोमवारी सीबीएस न्यूज मध्ये दिलेल्या बातमीनुसार yougov सर्व्हेक्षणात १० पैकी ८ अमेरिकन नागरिकांना सरकार नियंत्रणात नाही असे वाटते. या सर्व्हेक्षणात ७९ टक्के नागरिकांनी सध्याची देशातील स्थिती नियंत्रणाबाहेर असल्याचे मत दिले असून २६ टक्के लोक बायडेन यांच्याबाबत आशावादी आहेत तर ५६ टक्के लोकांनी बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून नाकारले आहे.

सीबीएस नुसार ट्रम्प ज्या रिपब्लिकन पक्षाचे आहेत त्या पक्षाला आज घडीला सदनात अधिक जागा जिंकता येतील असे दिसून आले आहे. २२८ जागा रिपब्लिकन पक्षाला तर २०७ जागा डेमोक्रॅटिक पक्षाला मिळतील असे संकेत मिळाले आहेत. अर्ध्याहून अधिक मतदारांनी अमेरिका उर्जा उत्पादन वृधीवर जोर देईल, बायडेन यांच्यावर महाभियोग चालविला जाईल आणि गर्भपात प्रतिबंध मागे घेतला जाईल अशी आशा व्यक्त केली आहे. रिपब्लिकन हे काम करतील अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत. ट्रम्प यांनी यापूर्वीच २०२४ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा ट्रम्प सरकार सत्तेवर येणार का या विषयी उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.