अमृता फडणवीस यांना वाय प्लस सुरक्षा, काय म्हणाले देवेंद्र?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली गेली आहे. राज्याच्या गृहमंत्रालयाला गुप्त माहिती विभागाकडून दिल्या गेलेल्या सूचनेनुसार ही सुरक्षा दिली गेली असून त्यांना वाहतूक क्लिअरन्स वाहनही दिले गेले आहे. अमृता यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक्स दर्जाची सुरक्षा होती, त्यात वाढ करून ती वाय प्लस दर्जाची केली गेली आहे. नव्या सुरक्षेत त्यांच्या साठी  एक एक्स्कॉर्ट वाहन आणि पाच पोलीस चोवीस तास तैनात असतील. मुंबई पोलीसांनी या संदर्भात आवश्यक त्या सूचना वाहतूक विभागाला दिल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी अजून वाहतूक क्लिअरन्स वाहनाचा वापर केलेला नाही असे समजते.

या बाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमृता यांनी सुरक्षा अपग्रेड करण्यासाठी अथवा वाहतूक क्लिअरन्स वाहनासाठी अर्ज केला नव्हता. उलट त्यांनी वाहतूक क्लिअरन्स वाहनाची गरज नाही असेच सांगितले होते. पण ज्या व्यक्तींना धोका आहे अशी शंका असेल तर हाय पॉवर कमिटी अशी सुरक्षा देते. फडणवीस यांनी ठाकरे परिवार आणि अन्य खासगी व्यक्तींना वाहतूक क्लिअरन्स वाहन दिले गेल्याचे निदर्शनास आणले. ते म्हणाले, पदाच्या आधारावर अशी सुरक्षा दिली जात नाही तर त्या व्यक्तीला असणारा धोका लक्षात घेऊन दिली जाते. अशी सुरक्षा घेणारे अनेक आहेत, ते आमदार नाहीत पण तरी त्यांना झेड, झेड प्लस सुरक्षा दिली गेली आहे.

फडणवीस यांच्या दाव्यावर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवसेना नेत्यांनी मात्र रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासाठी दोन एक्स्कॉर्ट होते असे सांगितले. अमृता फडणवीस यांना महाविकास आघाडी सरकार काळात एक्स दर्जाची सुरक्षा होती मात्र शिंदे सरकारने सत्तेवर येताच काही महिन्यात महाविकास आघाडीच्या काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला होता.