लॉकडाऊन – चीनच्या अॅपल फॅक्टरीत लाखो कामगार अडकले

चीनच्या झेंगझो भागात करोनाचा प्रसार वाढल्यामुळे लॉकडाऊन लावला गेला असून त्यामुळे येथील अॅपलच्या आयफोन फॅकटरी मध्ये लाखो कामगार अडकून पडले असल्याचे समजते. कंपनीच्या सीमा भिंतीवरून उड्या टाकून कर्मचारी पळून जात असल्याचे व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहेत. येथील फॉक्सकॉन कंपनी मध्ये ३ लाख कर्मचारी काम करतात. आयफोनचे जगातील सर्वाधिक उत्पादन याच कारखान्यात होते.

लॉकडाऊन मुळे कर्मचाऱ्यांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. वातूक पूर्ण बंद आहे. शिवाय करोना संसर्गाची भीती यामुळे येथील कर्मचारी मिळेल त्या मार्गाने आपल्या गावी परतण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेक लोक पायी चालत जाताना दिसत आहेत. कंपनीतून बाहेर पडता यावे यासाठी कामगारांनी असेम्ब्ली साईट फोडली असल्याचे समजते. करोना बचाव अॅप पासून सुटका मिळविण्यासाठी हे कामगार १०० किमी दूर असलेल्या घरी पायीच जाण्यास प्राधान्य देत आहेत. झेन्ग्झो भागात किती करोना केसेस आहेत याचा आकडा प्रसिद्ध केले गेलेला नाही.

कंपनीत काही लोकांना करोना लागण झाल्याने क्वरांटाइन केले गेले आहे त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. कामगारांना घरी जाण्यासाठी सरकार कडून कोणतीही मदत दिली जात नाही पण स्थानिक लोक मदत करताना दिसत आहेत. करोना बाधितांना क्रेनच्या सहाय्याने उचलले जात असल्याचे व्हिडीओ सुद्धा सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.