रिझर्व बँकेने आणला ‘डिजिटल रुपया’

आज म्हणजे १ नोव्हेंबर पासून रिझर्व बँकेने प्रायोगिक स्तरावर ‘डिजिटल रुपया’ परीक्षण सुरु केले असून त्यात ९ बँका सहभागी झाल्या आहेत. सध्या याचा वापर सरकारी सिक्युरिटी देवघेवी साठी केला जाणार आहे. सोमवारी या संदर्भातले पत्रक रीझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केले आहे. त्यात डिजिटल रुपयाचे पहिले प्रायोगिक परीक्षण १ नोव्हेंबर पासून सुरु होत असल्याचे नमूद केले आहे. या द्वारे सर्व ठोक देवघेव होऊ शकणार आहे.

या परीक्षण प्रक्रियेत स्टेट बँक, बँक ऑफ बरोडा, युनियन बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्र, यस बँक, आयडीएफसी, एचएसबीसी या बँका सहभागी झाल्या आहेत. डिजिटल चलनामुळे सध्याच्या चलनाचे स्वरूप अधिक पूरक होईल आणि देवघेवीसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे डिजिटल मुद्रा जारी करणारी आरबीआय ही जगातील पहिली केंद्रीय बँक बनली आहे. त्यापूर्वी दुबई, रशिया, स्वीडन, जपान, अॅस्टोनिया, वेनेझुएला यांनी क्रीप्टो करन्सी लाँच केली होती.

जगभरातील केंद्रीय बँका सीडीबीसी म्हणजे डिजिटल मुद्रा चलनात आणण्याच्या शक्यता पडताळून पाहत आहेत. भारत सरकारने २०२२-२३ साठी च्या अर्थ संकल्पात डिजिटल रुपया चलनात आणण्याची घोषणा केली होती. यामुळे आर्थिक गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे सुकर होणार आहे तसेच आंतरराष्ट्रीय देवघेवी साठी आणखी एक सुरक्षित पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे दुसऱ्या देशात पैसे पाठविणे स्वस्त पडणार आहे.

हा ‘ई रुपया’ टोकन आधारित असेल. म्हणजे ज्याला पैसे पाठवायचे त्याला पब्लिक ‘की’ च्या माध्यमातून तो पाठविता येईल. हे म्हणजे ई मेल आयडी सारखेच असेल. म्हणजे त्यासाठी पासवर्ड टाकावा लागेल. इंटरनेट नसेल तरी असे व्यवहार करता येणार आहेत. अर्थात या ई रुपयावर व्याज मिळणार नाही असा खुलासा रिझर्व बँकेने केला आहे.