हिंदी सक्तीला द्रविडी विरोध

चेन्नई: केंद्र सरकार हिंदी भाषेच्या वापराबद्दल राज्यांवर सक्ती करत असून या सक्तीला आपला तीव्र विरोध आहे, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी स्पष्ट केले आहे. या सक्तीच्या विरोधात दि ४ नोव्हेंबर रोजी द्रविड मुंनेत्र कळघम पक्ष राज्यभर निषेध सभा आयोजित करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

संसदीय समितीने आपल्या अधिकृत राजभाषा या विषयावरील अहवालाच्या ११ व्या भागात राज्यांना हिंदी भाषेच्या वापराची सक्ती करण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस घटनाविरोधी आहे. अशा शक्तीमुळे ‘ विविधतेतून एकता ‘ या भारताच्या मूळ गाभ्याला धक्का पोहोचत आहे, याकडे स्टॅलिन यांनी लक्ष वेधले आहे.

भाषा वादामध्ये आजपर्यंत शेकडो तरुणांचे बळी गेले आहेत. केंद्र सरकारने संसदीय समितीची शिफारस अमलात आणून भाषयुद्ध आणखी भडकावू नये. तसे करण्याने हिंदी भाषिक नसलेल्या राज्यांच्या नागरिकांमध्ये दुय्यम नागरिकत्वाची भावना निर्माण होऊ शकते. ही भावना देशाच्या एकात्मतेसाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा स्टॅलिन यांनी दिला आहे.

केंद्र सरकारकडून हिंदी भाषेच्या वापराची सक्ती केली जात असल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी डी एम के पक्षाच्या युवक आघाडीने १० ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आंदोलन केले होते. त्याचे पुढचे पाऊल म्हणून पक्ष नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यभर सभा घेऊन केंद्राकडून केल्या जाणाऱ्या हिंदी भाषेच्या सक्तीचा निषेध करेल, असे स्टॅलिन यांनी नमूद केले आहे.