संयुक्त राष्ट्र करणार ‘ डर्टी बॉम्ब ‘ ची पडताळणी

जिनेव्हा: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या काळात युक्रेनमधील दोन शस्त्र निर्मिती केंद्रात अण्वस्त्र अथवा जैविक अस्त्र विकसित करण्यात येत असल्याच्या रशियाच्या आरोपाची खातरजमा संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे.

युद्धाच्या काळात युक्रेन रशियावर अण्वस्त्र अथवा जैविक अस्त्र वापरून हल्ला करण्याच्या तयारीत असून त्या देशात दोन जागी अण्वस्त्र अथवा जैविक अस्त्र तयार केली जात आहेत.. त्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) या ठिकाणी भेट देऊन खातरजमा करावी, असे आवाहन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी नुकतेच केले आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देऊन संस्थेचे पथक युक्रेनमध्ये दोन्ही संशयित ठिकाणी एक आठवड्यात भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेईल, अशी ग्वाही अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी दिली आहे. युक्रेन अन्य शस्त्रास्त्रांच्या नावाखाली रशियाच्या विरोधात वापरण्यासाठी अण्वस्त्र अथवा जैविक अस्त्र विकसित करत असल्याचा रशियाचा आरोप आहे. संस्थेचे पथक प्रत्यक्ष भेट देऊन त्याबाबत वस्तुस्थिती पडताळून पाहील, असे ग्रोसी यांनी सांगितले.

युक्रेन अण्वस्त्र विकसित करत असल्याचा आरोप रशियाकडून या पूर्वीही करण्यात आला होता. त्यानुसार अणुऊर्जा संस्थेने एक महिन्यापूर्वी संशयित दोन पैकी एका ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती. त्या ठिकाणी अण्वस्त्र अथवा जैविक अस्त्र तयार केली जात नसल्याचा निर्वाळा संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने पाहणी केल्यावर दिला होता.

पूर्व आणि दक्षिण युक्रेनमध्ये माघार घ्यावी लागली असल्याने हताश झालेला रशिया अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत असून त्यासाठी योग्य पार्श्वभूमी तयार करणे आणि युक्रेन वर अणुबॉम्ब टाकण्यासाठी निमित्त शोधणे, यासाठी रशिया हा आरोप करत असल्याचा युक्रेनचा दावा आहे.