अमेरिका वाढवणार भारताशी संरक्षणात्मक भागीदारी


वॉशिग्टन: चीनच्या वाढत्या मुजोरीला आळा घालण्यासाठी भारताशी संरक्षण क्षेत्रात भागीदारी वाढविण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने घेतला आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय संरक्षण धोरण २०२२ नुकतेच संरक्षण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले. चीनचा विस्तारवाद, घुसखोरी आणि दादागिरी हे अमेरिकेच्या संरक्षण विभागासमोर उभे ठाकलेले सर्वात मोठे आव्हान आहे. या आव्हानाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी भारताबरोबर संरक्षणात्मक भागीदारी वाढवण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेचे प्रशासन त्या दृष्टीने पुढाकार घेईल, असे या संरक्षण धोरणात नमूद करण्यात आले आहे.

चीनचे त्याच्या सर्वच शेजारी राष्ट्रांशी सीमावाद आहेत. भारत, तैवान, तिबेट, भूतान या शेजारी देशांच्या भूभागावर चीन अतिक्रमण करीत आहे. हिंद महासागर क्षेत्रातही चीनची दादागिरी वाढत आहे. चीनच्या या विस्तारवादी धोरणाला आणि वाढत्या दादागिरीला वेळीच आळा घालण्याची आवश्यकता अमेरिकेच्या संरक्षण धोरणात व्यक्त करण्यात आली आहे.

चीनचे शेजारी राष्ट्रांच्या भूभागावर करण्यात येणारे अतिक्रमण, हिंद महासागर क्षेत्रातील दादागिरी यांना पायबंद घालण्यासाठी भारत आणि अमेरिका यांची संरक्षण क्षेत्रात भागीदारी अधिक दृढ करणे आवश्यक असून त्यासाठी आपले प्रशासन पुढाकार घेईल, अशी ग्वाही अमेरिकेच्या संरक्षण धोरणात देण्यात आली आहे.

अमेरिकेचे अण्वस्त्र विषयक धोरण आणि क्षेपणास्त्रांची सुरक्षितता याचा आढावाही वार्षिक संरक्षण धोरणात घेण्यात आला आहे.