अंबानी परिवाराच्या उपस्थितीत नाथद्वार येथून जिओ ५ जी सेवा सुरु

रिलायंस जिओने आज म्हणजे २२ ऑक्टोबर २०२२ , धनत्रयोदशी पासून राजस्थानच्या नाथद्वार येथून जिओची ५ जी सेवा सुरु केली आहे. सकाळी १० वा. सुरु झालेल्या कार्यक्रमात ही सेवा सुरु केली गेली. या साठी जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी, पत्नी श्लोका आणि मुलगा पृथ्वी यांच्या सह अंबानी परिवार उपस्थित होते. त्यांनी प्रथम श्रीनाथजींचे दर्शन घेतले आणि विशालबाबांचे आशीर्वाद घेतले. मोती महाल परिसरात हा दीड तासाचा कार्यक्रम पार पडत असून त्यानंतर आकाश अंबानी पत्रकाराशी बोलणार आहेत. मोतीमहाल आणि गोशाळेसह २० ठिकाणी टॉवर उभे केले गेले आहेत.

२०१५ मध्ये जिओचे तत्कालीन अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी येथूनच जिओची फोरजी सेवा सुरु केली होती. गेल्या महिन्यात मुकेश, त्यांच्या भावी सुनबाई राधिका मर्चंट यांच्यासह दर्शनासाठी नाथद्वार येथे आले होते तेव्हा त्यांनी फाईव्ह जी सेवा येथूनच सुरु केली जाईल याचे संकेत दिले होते.

अंबानी परिवाराची नाथद्वार श्रीनाथजी यांच्यावर परम श्रद्धा आहे. कोकिलाबेन अंबानी या मंदिर मंडळाच्या उपाध्यक्ष असून वारंवार त्या येथे भेट देतात. अनेकदा कोणतीही पूर्वसूचना न देता अंबानी परिवार येथे दर्शनासाठी येतो असेही सांगितले जाते. रिलायंसचे संस्थापक धीरूभाई यांचीही श्रीनाथजीवर दृढ श्रद्धा होती. कोणतेही शुभकार्य अथवा मोठा निर्णय घेण्याअगोदर अंबानी येथे दर्शनासाठी येतात असे समजते.