रायनएअर कंपनीने ट्रस यांना दिला खास बोर्डिंग पास

ब्रिटनच्या पंतप्रधानपदावरून ४४ दिवसात पायउतार झालेल्या लीज ट्रस यांच्या राजीनाम्याची चर्चा जगभरात सुरु आहे. त्या संदर्भात सोशल मिडीयावर मिम्सचा पाउस पडत आहे. आयर्लंडची विमानसेवा कंपनी रायनएअर ने ट्वीटरवर लीज ट्रस यांना एक खास, ‘कुठेही जा’ असा  बोर्डिंग पास दिला असून त्याचा फोटो शेअर केला आहे. त्यात म्हटले गेले आहे, ‘गॅटविक एअरपोर्ट वरून लीज या बोर्डिंग पास वर कुठेही जाऊ शकतात.’ या फोटो ला लाखो लाईक्स मिळाले आहेत आणि त्यावर शेकड्याने कॉमेंट्स आल्या आहेत.

अगदी कमी काळासाठी पंतप्रधानपदावर राहिलेल्या ट्रस यांची भरपूर चेष्टा केली जात आहे.  लीज यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षातील सदस्यांनी त्यांच्या नेतृत्वाविरुद्ध बंड केल्यामुळे लीज यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावेळी १० डाऊनिंग स्ट्रीट निवासस्थानासमोर बोलताना त्यांनी ‘ ज्या साठी लोकांनी मला निवडून दिले त्यात अपयश आल्याचे’सांगितले होते. लीज यांना राजीनामा दिल्यानंतर वार्षिक १ कोटी रूपये भत्ता दिला जाणार असून त्या विरोधात सुद्धा वाद निर्माण झाला आहे.

लोकांकडे पैसा नाही, खायला अन्न नाही अश्यावेळी फक्त ४४ दिवस पंतप्रधान राहिलेल्या लीज यांना भत्ता घेण्याचा हक्क नाही असा दावा केला जात आहे. लीज यांनी भत्ता नाकारावा अशी मागणी केली जात असून भत्ता हा लीज यांचा हक्क असल्याचा प्रतिवाद काही लोकांकडून केला जात आहे. पंतप्रधानांना भत्ता देण्याची प्रथा १९९१ पासून सुरु झाली होती. त्यानुसार मार्गारेट थॅचर, जॉन मेयर आणि टोनी ब्लेअर यांनी भत्ता घेतला आहे.