भारत चीन सीमेवरून मोदींनी भरला हुंकार

उत्तराखंड मधील बद्रीनाथ मंदिरात पूजा अर्चा करून भारत चीन सीमेवरील माणा गावात पंतप्रधान मोदी यांनी तेथील जनतेला संबोधित करून एक प्रकारे शेजारी देश चीन आणि पाकिस्तान यांना भारतीय ताकदीचा संदेश दिला. माथ्यावर त्रिपुंड लावलेल्या मोदींनी तेथील जनतेला सिमावर्ती भागातील देशवासीयांच्या गरजा, सुविधा आणि विकासावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले.

पंतप्रधान म्हणाले, ‘माणा ला आजपर्यंत भारताचे अंतिम गाव म्हणून हिणवले गेले आहे मात्र माझ्यासाठी सीमेवरचे प्रत्येक गाव हे देशातले पहिले गाव आहे. येथील नागरिक देशासाठी सशक्त प्रहरी आहेत. येथील लोकांचा गरजा, अपेक्षा यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. केदार, बद्री आणि हेमकुंड साहिब जोडले जात आहे. अयोध्या राममंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडोर अश्या सर्व श्रद्धास्थानांवर प्रत्येक भाविकाला सहज जाता आले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.देश गुलामीत होता त्यामुळे आमची श्रद्धास्थाने जर्जर झाली. स्वातंत्र मिळाल्यावर सुद्धा त्याच्या पुनरुत्थानासाठी काही केले गेले नाही. आता मात्र या सर्व अडचणी दूर केल्या जात आहेत.’

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते १२.४० किमी चा गोविंदघाट- हेमकुंड रोपवे, ९.७ किमीचा गौरीकुंड केदारनाथ रोपवे आणि ३४०० कोटींचे रस्ते रोपवे प्रकल्पांचे उद्घाटन केले गेले. यंदा चारधाम यात्रेसाठी ४५ लाख भाविक आले होते. मोदी म्हणाले, ‘तरुण पिढीला सुद्धा आपल्या श्रद्धास्थानांची ओळख व्हायला हवी. त्यामुळे येथे रोजगार निर्मिती होणार आहे. ड्रोनच्या सहाय्याने पहाडी भागातून भाज्या शहरी भागात आणल्या जात आहेत. बचत गटांनी बनविलेले मीठ, मसाले येथे येणाऱ्या भाविकांनी जरूर खरेदी केले पाहिजेत. देशातील सर्व नागरिकांना माझे हे आवाहन आहे. तुम्ही जो प्रवास खर्च करता त्यातील पाच टक्के तरी स्थानिक उत्पादन खरेदीवर खर्च करावा त्यामुळे या दुर्गम भागातील आपल्या बांधवाचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.’