या देशात आजारपणाची दिली जाते दोन वर्षे रजा आणि ७० टक्के पगार

कुठल्याही देशात कर्मचारी वर्गाला सुट्ट्या, फायदे, सवलती, सुविधा कशा आणि किती प्रमाणात दिल्या जातात हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय आहे. सुट्ट्या संपून गेल्या आणि आजारपण आले तर पगार कापला जाणार याचे अनेकांना टेन्शन असते. नेदरलंड हा देश मात्र अश्या कारणांसाठी कर्मचाऱ्यासाठी नंदनवन म्हणावा लागेल. या देशात आजारपणाची रजा चक्क दोन वर्षे दिली जाते आणि त्या काळात पगाराच्या ७० टक्के रक्कम पगार म्हणून दिली जाते. इतकेच नव्हे तर आजारपणातून बरे झाल्यावर पुन्हा नोकरी साठी प्रयत्न केला जातो. आजारपणात ओव्हरटाईम आणि सप्लीमेंट सुद्धा दिले जातात.

येथे पर्मनंट कॉन्ट्रॅक्ट, फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट, ऑन कॉल एम्प्लोईज अश्या कामाच्या श्रेणी आहेत. त्या सर्वाना ही सुविधा दिली जाते. मात्र त्यासाठी सिकेनेस बेनिफिट अर्ज करावा लागतो. त्याचे ऑडीट केले जाते आणि काही गडबड दिसली तर पूर्ण रक्कम वसूल केली जाते. आजारापणांच्या पहिल्या वर्षात ७० टक्के पगार दिला जातो. ही रक्कम किमान पगारापेक्षा कमी असेल तर त्यात भर घालून किमान वेतनाइतकी रक्कम दिली जाते. दुसर्या वर्षीही ७० टक्के पगार दिला जातो पण त्यात किमान वेतनाची ही रक्कम मॅच केली जात नाही.

कुणी अवयव दान केल्याने, प्रेग्नसी किंवा बाळंतपण या कारणांनी आजारी असेल तर त्याला १०० टक्के पगार दिला जातो पण दरम्यान एखाद्याचे कॉन्ट्रॅक्ट संपले तर मात्र पगार दिला जात नाही. या काळात वैयक्तिक भत्ते, अन्य फायदे पगारानुसार दिले जातात.