महिला वर्गाला मागे सारून यंदा खरेदीत पुरुष आघाडीवर

दोन वर्षे कोविड मुळे पडलेल्या खरेदीचा उपवास यंदाच्या वर्षी सुटला आहे. दिवाळीसाठी मनमुराद खरेदीच्या मूड मध्ये ग्राहक आहेत. जगभरात मंदी आणि युद्धाचे सावट असल्याने ग्राहक कमी आहेत पण भारतात मात्र त्यांच्या बरोबर उलट स्थिती दिसून येत आहे. या वर्षी दिवाळी खरेदीत पुरुषांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत असून त्यांनी महिला वर्गाला मागे टाकले आहे. यंदा खरेदीदारात ६५ टक्के पुरुष तर महिला ग्राहक ५५ टक्के आहेत. दुकाने, बाजार आणि ऑनलाईन खरेदीची एकाच धूम दिसून येत आहे. फॅशन अॅक्सेसरिज, कपडे, मोबाईल, घरगुती वापराच्या वस्तू, दागिने, घरे,वाहने, सजावट सामान, गिफ्ट अश्या अनेक प्रकारची खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.

रॉयटरच्या रिपोर्ट नुसार कार्स, घरे, दागिने आणि प्रवासावर मोठी रक्कम खर्च केली जात असून याला ‘रिव्हेंज शॉपिंग’ असे म्हटले जात आहे. या सिझन मध्ये बाजारात २ लाख कोटींची उलाढाल होईल असा अंदाज आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या रिपोर्ट नुसार ऑफलाईन विक्री १५ अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त असेल. २०१९ मध्ये हाच आकडा ८.५ अब्ज डॉलर्स होता. फेस्टीव्ह सिझन मध्ये सप्टेंबर शेवट ते नोव्हेंबरची सुरवात या काळात २७ अब्ज डॉलर्स म्हणजे २.२ लाख कोटींचा व्यवसाय होईल असा अंदाज असून गतवर्षी पेक्षा हा आकडा २५ टक्के जास्त आहे.

ऑनलाईन विक्री १२ अब्ज डॉलर्स म्हणजे १ लाख कोटींची होईल असे संकेत मिळाले असून त्यात अमेझोन, फ्लिपकार्ट यांना थेट फायदा मिळणार आहे. ऑनलाईन ग्राहक संख्या २०१८ नंतर चौपट झाली असून २० कोटींवर गेली आहे. लहान शहरातून ग्राहक संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि मोबाईल, कपडे अश्या वस्तूंना अधिक मागणी आहे. नवरात्री पासून वाहन विक्री वाढली असून त्यात गतवर्षीपेक्षा ५७ टक्के वाढ झाली आहे. घरखरेदी मध्ये ७० टक्के वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.