प्रथमच ‘भारत जोडो’ यात्रा सोडून दिल्लीत येणार राहुल गांधी

कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले मल्लीकार्जुन खर्गे यांच्या पदग्रहण समारंभात कॉंग्रेस नेता आणि माजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सहभागी होणार आहेत. दिल्लीला कॉंग्रेसच्या मुख्यालयात २६ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम होणार असून त्यासाठी भारत जोडो यात्रा सोडून राहुल दिल्लीत येत आहेत. विशेष म्हणजे ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी पासून सुरु झालेल्या या यात्रेत प्रथमच राहुल गांधी यात्रा सोडून दिल्लीत येत आहेत. ही यात्रा १५० दिवसांची आहे.

कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष म्हणून सध्या सोनिया गांधी काम पाहत आहेत आणि त्यापूर्वी अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गांधी यांच्या कडे होती. मात्र २०१९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला दारूण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडले होते. तब्बल २६ वर्षानंतर खर्गे यांच्या रूपाने कॉंग्रेसला बिगर गांधी अध्यक्ष मिळाला आहे. त्याच्या पदग्रहण सोहळ्यास कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य, प्रदेश कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष, खासदार, आमदार, माजी मुख्य प्रदेशाध्यक्ष, आणि अन्य पदाधिकार्यांना निमंत्रणे पाठविली गेली आहेत.