फाईव्ह जी मुळे नोकऱ्यांत लक्षणीय वाढ पण सायबर धोकेही वाढले

देशात फाईव्ह जी सेवा सुरु झाल्याचे परिमाण दिसायला सुरवात झाली असून ही सेवा क्रांती घडवेल असे संकेत मिळू लागले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम जाणवू लागले आहेत. फाईव्ह जी सेवा सुरु होण्यापूर्वीच गेल्या वर्षभरात टेलीकम्युनिकेशन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती होताना दिसत असून मोठ्या प्रमाणावर जॉब्स उपलब्ध होऊ लागले आहेत. ग्लोबल जॉब साईट ईंडीड नुसार सप्टेंबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ या काळात टेलीकॅम्यूनिकेशन क्षेत्रात ३३.७ टक्के वाढ झाल्याचे नमूद केले गेले आहे. अनेक व्यावसायिकांनी अगोदरच फाईव्ह जी तंत्रज्ञान, सेवा विकसित करण्याचे काम सुरु केले आहे.

मोबाईल कंपन्यांवर फाईव्ह जीचा विस्तार वेगाने करण्याचा दबाव निर्माण झाला असून युद्धस्तरावर त्यांना काम करावे लागत आहे. सिक्युरिटी सिस्टीम पासून नवे तंत्रज्ञान वापर, नेटवर्क आर्किटेक्चर साठी कुशल आणि अकुशल कामगाराची गरज वाढली आहे. पण सायबर गुन्ह्याचे प्रमाण सुद्धा लक्षणीय रित्या वाढल्याने सायबर सुरक्षा क्षेत्रात सुद्धा कर्मचारी मागणी मोठी आहे.

कोविड १९ मध्ये सुरु झालेले वर्क फ्रॉम होम मुळे ऑफिसेस ऑनलाईन झाली आणि देवघेव डिजिटल स्वरुपात होऊ लागल्याने सायबर गुन्हे वाढले आहेत. परिणामी ऑगस्ट २०१९ ते ऑगस्ट २०२२ या काळात सायबर सुरक्षा जॉब मध्ये ८१ टक्के वाढ झाली आहे. त्यात फाईव्ह जी लाँच होण्याच्या काही महिने अगोदर प्रचंड वाढ झाली असे दिसून आले आहे. तंत्रसहाय्य, बीपीओ, कस्टमर सपोर्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुद्धा भरघोस वाढ झाल्याचे दिसून आले आहे.