प्रथमच अयोध्या दीपोत्सवात सामील होणार पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यंदा प्रथमच अयोध्येत शरयू तीरावर दरवर्षी होत असलेल्या दीपोत्सवात सामील होणार आहेत. मोदी यांचा हा दुसरा अयोध्या दौरा आहे. यापूर्वी करोना काळात मोदी ५ ऑगस्ट रोजी रामजन्मभूमी शिलान्यास करण्यासाठी आले होते. आता २३ ऑक्टोबर रोजी मोदी दीपोत्सवात सामील होण्यासाठी अयोध्येत येत आहेत. यावेळी ते राम मंदिर निर्माण प्रगतीचा आढावा घेतील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षातील दिपोत्सावासाठी मोदी प्रमुख्य पाहुणे आहेत. त्यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे.

पंतप्रधान राम राज्याभिषेक सोहळ्यात सुद्धा सहभागी होणार आहेत आणि शरयू आरती करणार आहेत. राम पौडीवर पणती प्रज्वलित करून ते दीपोत्सवाची सुरवात करणार आहेत. त्यावेळी आतषबाजी केली जाणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानपदी असताना अयोध्येत येऊन रामललाचे दर्शन घेणारे मोदी पहिले पंतप्रधान आहेत. यापूर्वी पाच पंतप्रधान अयोध्येत येऊन गेले होते मात्र त्यापैकी कुणीच रामलला चे दर्शन घेतले नव्हते असे सांगितले जात आहे.

इंदिरा गांधी जेव्हा अयोध्येला आल्या होत्या तेव्हा राम जन्मभूमीला कुलूप घातले गेले होते. न्यायालयाने कुलूप काढण्याचे आदेश नंतर दिले होते. इंदिराजी एकूण तीन वेळा अयोध्येला आल्या होत्या. १९६६ मध्ये शरयू पुलाचे उद्घाटन करण्यासाठी , १९७५ मध्ये महंत नरेन्द्र देव कृषी विद्यापीठाचा शिलान्यास करण्यासाठी आल्या होत्या. १९७९ मध्ये त्यांनी येथे येऊन हनुमान गढी मध्ये बजरंगबळीचे दर्शन घेतले होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना १९९० मध्ये सद्भावना यात्रेत सहभागी होण्यासाठी आले होते पण त्यांनी रामललाचे दर्शन घेतले नव्हते. १९९७ मध्ये देवेगौडा यांनीही अयोध्येला ओव्हर ब्रिजचा शिलान्यास करण्यासाठी भेट दिली होती. अटल बिहारी वाजपेयी २००२ आणि २००४ असे दोन वेळा अयोध्या भेटीवर आले होते पण त्यांनीही रामललाचे दर्शन घेतले नव्हते.