चीनचे रहस्यमयी नवे ड्रोन पाहून संरक्षण तज्ञ हैराण

चीन आणि अमेरिका यांच्यात वाढत चाललेला तणाव आणि एकमेकांना खुन्नस देण्यासाठी अवलंबिले जात असलेले अनेक मार्ग या पार्श्वभूमीवर चीनच्या नव्या मानवरहित ड्रोनने संरक्षण तज्ञ हैराण झाले आहेत. हे ड्रोन प्रथम दृष्टीत अमेरिकेच्या फायटर ड्रोन एक्स -४७ बी प्रमाणे वाटते आहे. अमेरिकेचे ड्रोन नॉर्थरोप गुम्मान ग्रुपने तयार केले होते मात्र आता हे ड्रोन सेवेतून निवृत्त केले गेले आहे.

चीनचे ड्रोन सेनेत सामील झाले असावे किंवा ते विकसित केले जात असावे असा संशय व्यक्त केला जात असून या संदर्भात चीनी सोशल मिडिया वेब विबोने एक १३ मिनिटांचा व्हिडीओ अपलोड केला आहे. पण चीनने जे ड्रोन तयार केले आहे ते व्हिडीओ मधील ड्रोन पेक्षा वेगळे दिसत असल्याने त्या विषयी शंका निर्माण झाल्या आहेत. हे ड्रोन चीनच्या अन्य एक ड्रोन स्टार शॅडो प्रमाणे दिसते आहे. हा फोटो अस्पष्ट आहे.त्यामुळे ते स्टार शॅडोचे अपग्रेडेड व्हर्जन असावे असा तर्क केला जात आहे.

स्टार शॅडो चीनी स्टार युएव्ही सिस्टीम चेंगडू येथील कंपनीने २०१८ मध्ये तयार केली असून त्याचे प्रदर्शन सिंगापूरच्या एअरशो मध्ये त्या वर्षी केले गेले होते. स्टार शॅडोचे पंख ५० फुट लांब असून ड्रोनची लांबी २३ फूट आहे. ते सलग १२ तास हवेत उड्डाण करू  शकते. हे सर्वात ताकदवर ड्रोन आहे आणि चीनने अशी अनेक स्टील्थ ड्रोन तयार केली आहेत जी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त नुकसान करू शकतात. गेली १० वर्षे चीन ड्रोन क्षमता वाढविण्यावर काम करत आहे आणि गेल्या काही दिवसात या कामाला गती दिली गेली आहे. अमेरिकेला मागे टाकणे  हाच चीनचा एक मुख्य हेतू असून जगापासून लपवून हे काम केले जात आहे.