बॉलीवूड मध्ये यंदा बच्चन, शाहरुख खान यांच्याकडे दिवाळी पार्टी नाही

दिवाळीची धूम बॉलीवूड मध्ये दरवर्षी जोरदार चर्चेत असते. बॉलीवूडची शान समजले जाणारे बिग बी उर्फ अमिताभ बच्चन आणि किंग खान शाहरुख यांच्या घरी दरवर्षी दिवाळीची जोरदार पार्टी दिली जाते आणि झाडून सारे सेलेब्रिटी या पार्टी मध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात. दिग्दर्शक करण जोहर यांच्या कडे सुद्धा जोरदार पार्टी होते. पण यंदा या तिन्ही ठिकाणी साधेपणाने आणि मोजक्या मित्रमंडळी सोबत दिवाळी साजरी केली जात असल्याचे समजते.

करण जोहर याने घरात नूतनीकरण सुरु असल्याने दिवाळी मेजवानी कॅन्सल केली आहे तर बिग बी आणि शाहरुख यांनी करोना केसेस पुन्हा वाढत चालल्याचे कारण देऊन यंदा दिवाळी घरच्या घरी साधेपणाने साजरी करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र असे असले तरी बॉलीवूड मधील अन्य काही कलाकार दिवाळी धूमधडाक्यात साजरी करणार आहेत आणि त्याच्याकडे दिवाळी पार्टीची जोरदार तयारी सुरु आहे. शिल्पा शेट्टी, मनीष मल्होत्रा यावर्षी जोरदार पार्टी करणार असून त्यांनी अनेक सेलेब्रिटीना निमंत्रण दिले असल्याचे समजते.

आयुष्मान खुराना याने दोन दिवसापूर्वीच दिवाळी पार्टी दिली आहे. यंदा अक्षय कुमार मात्र घरच्या घरी आणि मोजक्या नातेवाईकांच्या समवेत दिवाळी साजरी करणार आहे.