येथे बसविला गेला जगातील सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी दुनियेतील अतिविशाल कॅमेरा तयार केला असून त्यातून २४ किमी दूर अंतरावर असलेल्या चेंडूचा सुद्धा स्पष्ट फोटो काढता येईल इतकी त्यांची क्षमता आहे. या कॅमेऱ्यातील लेन्सला ३२०० एमपीचा सेन्सर बसविला गेला आहे. छोट्या कार इतक्या आकाराच्या या कॅमेरयाचे वजन ३ टन आहे आणि आणि तो पाच फुट रुंद आहे. त्याच्या फ्रंट लेन्सचा सेन्सर ३२०० एमपीचा असून आवाज कमी व्हावा म्हणून ते उणे १०० डिग्री सेल्फ कुल होते.

एक काळ असा होता कि ०.७ एमपी कॅमेरयाने आपण फोटोग्राफी करत होतो. त्यानंतर तंत्रज्ञान वेगाने विकसीत होत गेले आणि लेन्सची गुणवत्ताही सुधारली. १०,१२ एमपी नंतर ६४, १०८ एमपीचे सेन्सर स्मार्ट फोन मध्ये सुद्धा मिळू लागले. आता २०० एमपीचे सेन्सर सुद्धा स्मार्टफोन मध्ये आले असून त्यामुळे फोटोग्राफी साठी मोठ्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी तयार केलेला हा दुनियेतील सर्वात मोठा कॅमेरा कॅलिफोर्नियाच्या मेनलो पार्क मध्ये बसविला गेला असून तो तयार करायला सात वर्षे लागली आहेत. कॅमेरा इन्स्टॉलेशनचे काही काम अजून बाकी आहे. पूर्ण कार्यान्वित झाल्यावर हा कॅमेरा पुढील १० वर्षे सदर्न नाईट स्कायचे सर्व्हेक्षण करणार आहे. या कॅमेरा लेन्स मधून येणारी प्रतिमा इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये बदलली जाते व अतिशय स्पष्ट फोटो मिळतात. या कॅमेर्यातून  मिळणाऱ्या प्रतिमांमुळे अंतराळातील माहिती मिळेल आणि अंतराळातील अनेक रहस्ये उलगडली जातील असे सांगितले जात आहे.

या कॅमेरयातून १०वर्षे घेतल्या गेलेल्या प्रतिमांचा डेटा तयार केला जाणार आहे. त्याचा उपयोग वैज्ञानिक ब्रह्मांडातील अनेक कोडी उलगडण्यासाठी करू शकतील. डार्क एनर्जी, डार्क मॅटर या सारख्या गोष्टी उकलण्यासाठी त्यांचा वापर होऊ शकेल. या कॅमेऱ्यातून काढले गेलेले फोटो ३७८ फोर के अल्ट्रा हाय डेफिनेशनचे असतील असे समजते. या कॅमेऱ्याला लार्ज सिनोप्टीक सर्वे टेलेस्कोप (एलएसएसटी) असे नाव दिले गेले आहे.