बकिंघम पॅलेस मध्ये जाण्यासाठी किंग चार्ल्स थर्ड यांची खास अट

ब्रिटनचे नवे राजे चार्ल्स थर्ड परंपरेनुसार बकिंघम पॅलेस मध्ये राहण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत असे बोलले जात आहेच पण एका अटीवर ते या जगातील सर्वात मोठ्या महालात वास्तव्य करण्यासाठी तयार आहेत असे समजते. हा महाल आधुनिक जगाच्या गरजेनुसार नाही असे चार्ल्स यांचे म्हणणे आहे. संडे टाईम्सच्या वृत्तानुसार हा महाल आधुनिक राहणी नुसार तयार करायला किमान पाच वर्षे लागणार आहेत आणि त्यासाठी ३४०० कोटी खर्च येणार आहे.

किंग चार्ल्स यांच्या म्हणण्यानुसार या महालात आधुनिक सुविधा करून त्या टिकणार नाहीत. त्यात अनेक बदल करावे लागतील त्यामुळे सध्या तरी चार्ल्स या महालात राहण्यास येण्याची शक्यता नाही. या महालात ७७५ खोल्या, १८८ स्टाफ रूम्स, ५२ शाही व गेस्ट बेडरूम्स, ९२ कार्यालये, ७८ बाथरूम्स, आणि १९ स्टेट रूम्स आहेत. पूर्वी सुद्धा चार्ल्स अगदी आवश्यकता असेल तेव्हाच या महालाला भेट देत असत. क्वीन कंसोर्ट कॅमिला यांना येथे राहण्यासाठी येण्याची मुळीच इच्छा नाही असेही समजते.

ही सर्व परिस्थिती लक्षात घेतली तर या महालाचा बराच मोठा भाग जनतेला पाहण्यासाठी खुला केला जाईल आणि त्याचा व्यावसायिक कारणांसाठी अधिक वापर केला जाईल असे म्हटले जात आहे. किंग चार्ल्स थर्ड सध्या क्लेरेंट हाउस मध्ये राहत असून त्यांचा राज्याभिषेक ६ मे रोजी वेस्टमिन्स्टर अॅबे मध्ये होणार आहे.