२४ ऑक्टोबर- ब्रिटन मध्ये  इस बार सुनक सरकार?

निवडणूक जाहीरनाम्यात केलेले वादे पूर्ण करणे आणि नंतर ते मागे घेणे ब्रिटनच्या पंतप्रधान लीज ट्रस यांना चांगलेच महागात पडणार आहे. ‘द डेली मेल’ च्या रिपोर्ट प्रमाणे २४ ऑक्टोबर रोजी ब्रिटनच्या पंतप्रधानांना सत्तेतून बेदखल केले जाण्याची दाट शक्यता आहे. करकपात लागू करणे, वीज बिले कमी करणे आणि हे दोन्ही निर्णय फिरवणे, सत्तेवर आल्यावर ४० दिवसातच अर्थ मंत्र्यांची हकालपट्टी करायची वेळ या आणि अश्या अनेक कारणामुळे ट्रस सरकारला विश्वासदर्शक ठरावाचा सामना करण्याची वेळ आली असून यावेळी ऋषी सुनक हे पंतप्रधान पदावर येतील असा दावा केला गेला आहे.

ट्रस यांनी सत्तेवर आल्यावर घेतलेल्या कर संदर्भातील अनेक निर्णयांमुळे अर्थ बाजारात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. महागाई वाढ, कार्पोरेट कर कपात यामुळे सत्तारूढ हुजूर पार्टीचे १०० सदस्य ट्रस यांच्या विरुद्ध अविश्वासाचे पत्र ग्रॅहम ब्रॅडी यांच्या कडे सोपविणार आहेत. पंतप्रधान झाल्यावर ट्रस यांनी वादे पुरे करण्यासाठी स्थानिक कर व वीज बिल कपात करता यावी म्हणून २३ सप्टेंबर रोजी मिनी बजेट मंजूर केले होते, त्यावर व्यापाऱ्यांनी कर्ज वाढेल असा इशारा दिला होता. २ ऑक्टोबर रोजी या घोषणा मागे घेतल्या गेल्या. यामुळे बाजारात गोंधळाचे वातावरण तयार झाले आणि ट्रस यांना विरोध वाढला असे समजते.

२०१६ मध्ये ब्रेग्झीट मधून बाहेर पडल्यापासून ब्रिटनने तीन पंतप्रधानांना हटविण्याचे रेकॉर्ड केले असून आता चवथा पंतप्रधान त्याच मार्गावर आहे. इतकेच नव्हे तर त्यामुळे हुजूर पार्टीची लोकप्रियता घसरली आहे. पंतप्रधन पदासाठी ऋषी सुनक हे सर्वात लोकप्रिय दावेदार मानले जात असून या आठवड्याअखेर ब्रिटनच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळेल असे संकेत दिले गेले आहेत.