म्हणून या चपलांना पडलेय ‘हवाई चप्पल’ नाव

स्लीपर्स किंवा हवाई चप्पल ही अनेकांच्या रोजच्या वापरातील वस्तू आहे. घालायला हलक्या, आरामदायी, पायांना रिलॅक्स करणाऱ्या या स्लीपर्स घरी दारी, बाहेर कुठेही सहज वापरता येतात. पण या केवळ हलक्या आहेत म्हणून त्याला हवाई म्हटले जात नाही तर त्याचा संबंध या स्लीपर्सच्या उत्पत्तीशी आहे. इतिहासकार सांगतात, अमेरिकेतील हवाई बेटावर एक खास प्रकारच्या वृक्ष सापडतो. त्याला ‘टी ट्री’ असे नाव असून या झाडापासून खास रबरासारखे फॅब्रिक बनते ते अतिशय लवचिक असते आणि त्यापासून या चप्पल बनविल्या जातात. या स्लीपर्सचा जपानशी सुद्धा संबंध आहे.

असे म्हणतात या प्रकारच्या चपला जपान मध्ये प्राचीन काळापासून वापरत आहेत. त्याला जोरी असे नाव आहे. अमेरिकेतील हवाई बेटावर जपान येथूनच मजूर गेले होते आणि त्यांनी त्यांच्याबरोबर या चपला नेल्या होत्या. मग तेथे तशाच प्रकारच्या चपला बनविल्या गेल्या त्याच हा हवाई चप्पल. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैनिकांनी वापरल्या आणि मग त्या जगभरात प्रसिध्द झाल्या. अनेक देशातून फिरत फिरत त्या भारतात आल्या. भारतात स्लीपर किंवा हवाई चप्पल आणण्याचे श्रेय ‘बाटा’ यांच्या कडे जाते. त्यापूर्वी ब्राझीलच्या हवाई नाज कंपनीच्या स्लीपर जगात प्रसिद्ध होत्या पण भारतात मात्र बाटा यांच्यामुळेच या स्लीपर्स आल्या.