या गावात आहेत कौरव पांडवांचे वंशज

उत्तराखंड ही देवभूमी आहे आणि निसर्गसौदर्य, शांतता, रमणीय ठिकाणे यामुळे जगभरातून येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. काही प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटक प्रचंड गर्दी करतात. पण तुम्हाला शांत, सुंदर ठिकाणी तुमची सुट्टी घालवायची असेल तर गर्दीपासून दूर असलेल्या कलाप या गावाचा नक्की विचार करू शकता. हे गाव छोटेसे, अगदी कमी लोकवस्तीचे आणि थोडे दुर्गम असले तरी या गावाला मोठा इतिहास आहे आणि त्याचा संबंध थेट रामायण, महाभारताशी आहे.

या गावात हजारो वर्षे कौरव आणि पांडवांचे वंशज राहत आहेत. गढवालच्या उत्तरी भागात हे गाव असून बाकी भागापासून ते थोडे बाजूला आहे. टंस खोर्यातील हे गाव आहे. हे सारे खोरे महाभारताची जन्मभूमी मानले जाते. येथील स्थानिक लोकांचे आयुष्य खडतर आहे. त्यांची सारी कमाई शेतीवर अवलंबून आहे. हा भाग बाकी भूमीपासून दूर असल्याने येथील खाणे, पिणे, कपडा अश्या सर्व गरजा गावातच भागविल्या जातात. शेतीच्या जोडीला बकरी पालन केले जाते.

या गावात कर्णाचे मंदिर असून दर दहा वर्षात एकदा येथे ‘कर्ण महाराज उत्सव’ साजरा केला जातो. जानेवारी मध्ये पांडव नृत्य कार्यक्रम केला जातो. पर्यटन विकासासाठी आता येथे अनेक सुविधा दिल्या जात आहेत. वर्षातील कोणत्याही सिझन मध्ये येथे जाता येते. डेहराडून पासून २१० किमी प्रवास आहे आणि ट्रेकचे दोन मार्ग सुद्धा आहेत.