ब्लॅक हार्नेट हेलिकॉप्टर, मावते मुठीत, पण किंमत १ कोटी

दिसायला खेळण्यातले वाटेल असे हातावर सहज मावणारे एक हेलिकॉप्टर प्रत्यक्षात अतिशय खतरनाक आहे. मूर्ती लहान कीर्ती महान हे तत्व या हेलीकॉप्टरला तंतोतंत लागू पडते. पीडी-१०० ब्लॅक होर्नेट असे त्याचे नाव असून त्याचा वापर अतिसंवेदनशील भागात प्रामुख्याने सेनेकडून केला जातो. हे छोटेसे हेलिकॉप्टर ड्रोन प्रमाणे काम करते आणि सेना तसेच सशस्त्र दलांची सुरक्षा करण्यास सक्षम आहे. युद्धात आघाडीवरील सैनिकांचा बचाव करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हे आकाराने खूपच छोटे असल्याने शत्रू सहज फशी पडतो.

पीडी-१०० ब्लॅक होर्नेट बचाव कामी तसेच सर्च ऑपरेशन साठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. नॉर्वेच्या प्रॉक्स डायनामिक कंपनीने त्याचे डिझाईन केले आहे. फार कौशल्याने हे डिझाईन केले गेले असून या हेलीकॉप्टरचा वापर अमेरिका, फ्रांस, युके, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, तुर्की, नॉर्वे, नेदरलंड, पोलंड, न्यूझीलंड आणि भारतीय सेना करते. या छोट्याश्या उपकरणाने त्याची उपयुक्तता अनेक वेळा सिद्ध केली आहे.

या हेलीकॉप्टरची लांबी १० सेंटीमीटर आणि रुंदी २.५ सेंटीमीटर आहे. त्याला तीन कॅमेरे आहेत. एक पुढे, दुसरा खाली आणि तिसरा ४५ डिग्री परिसरातील सर्व हालचाली टिपू शकतो. पीडी-१०० ब्लॅक होर्नेट वापरणे अतिशय सोपे असून कोणताही जवान केवळ २०-२५ मिनिटे प्रशिक्षण घेऊन त्याचा वापर करू शकतो. एका चार्ज मध्ये ते ३० मिनिटे उडू शकते. पीडी-१०० ब्लॅक होर्नेट या छोट्याश्या हेलिकॉप्टरची किंमत आहे १ कोटी रुपये.