देशात प्रथमच मालगाडीसाठी अल्युमिनियमच्या वाघिणी

रविवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भुवनेश्वर रेल्वे स्टेशनवरून एका मालगाडीला हिरवा कंदील दाखवला. या मालगाडीचे खास वैशिष्ट म्हणजे या गाडीला जोडलेल्या वाघिणी (माल वाहतूक करणारे डबे) अल्युमिनियम पासून बनविले गेले आहेत. देशातील या प्रकारचे हे पहिलेच डबे असून हिंदाल्को, आरडीएसओ आणि बीएससीओ या कंपन्यांनी ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत तयार केले आहेत.

या वाघिणी सामान्य लोखंडी वाघिणींच्या तुलनेत वजनाला हलक्या आहेतच पण त्यांची माल वाहून नेण्याची क्षमता अधिक आहे. सामान्य लोखंडी डब्यांच्या तुलनेत हे नवे डबे ३.२५ टनाने हलके आहेत आणि ते १८० टन पेक्षा अधिक माल वाहून नेऊ शकतात. यामुळे इंधन बचत होते आणि कार्बन उत्सर्जन नियंत्रित करता येते. सामान्य डब्याच्या तुलनेत हे अल्युमिनियम डबे ३५ टक्के महाग आहेत कारण त्यांचे पूर्ण सुपर स्ट्रक्चर अल्युमिनियम पासून बनविले गेले आहे. हे डबे लोखंडी डब्यांच्या तुलनेत १० वर्षे अधिक टिकतात, त्यांच्या देखभालीचा खर्च कमी आहे, त्यांना गंज चढत नाही आणि त्यांची घर्षण प्रतिरोध क्षमता अधिक आहे. हे डबे खास माल वाहून नेण्यासाठीच डिझाईन केले गेले आहेत.

वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार या डब्यांना स्वचलित स्लायडिंग प्लग दरवाजे आहेत आणि ते लॉकिंग व्यवस्थेसह रोलर क्लोर सिस्टीम सह आहेत. या डब्याच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जन १४५०० टनांनी कमी होणार असून या डब्यांचे लाईफ ३० वर्षे आहे. आगामी काळात अश्या १ लाख वाघिणी वापरात आणल्या जातील त्यामुळे कार्बन उत्सर्जन वर्षाला २५ लाख टन कमी होणार आहे.