केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंद केली करोना लस खरेदी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरात करोना केसेस लक्षणीय रित्या कमी झाल्याने आणि मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण झाले असल्याने आता कोविड १९ लस खरेदी बंद केल्याचे समजते. इतकेच नव्हे तर लस खरेदीसाठी दिले गेलेले आणि शिल्लक राहिलेले ४२३७ कोटी रुपये आरोग्य मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाला परत केल्याचेही सांगितले जात आहे. केंद्राकडे १.८ कोटींपेक्षा अधिक लस डोस शिल्लक आहेत. यातून पुढचे सहा महिने लसीकारण होऊ शकणार आहे. करोना कमी झाल्यामुळे लस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी झाले आहे.

त्यातून यंदा केंद्राने सर्व ज्येष्ठ नागरिकांना देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे झाल्यानिमित्त ७५ दिवसांची कोविड लसीकरण मोहीम राबविली होती आणि त्यात नागरिकाना मोफत लस दिली गेली. सध्या तर लसीला नागरिकांकडून मागणी नाही. केंद्र आणि राज्यांकडे पुरेसा लस साठा आहे. काही महिन्यानंतर हा साठा एक्स्पायर होणार आहे. त्यामुळे नवीन खरेदी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. सहा महिन्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन नव्या खरेदी संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

गतवर्षी १६ जानेवारी पासून देशात कोविड १९ लसीकरण मोहीम सुरु झाली होती. राज्य आणि केंद्र सरकारने ही लस सरकारी हॉस्पिटल मधून मोफत उपलब्ध केली होती. १६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत देशात २१९.३२ कोटी नागरिकांना लस दिली गेली असून ९८ टक्के ज्येष्ठ नागरिकांना किमान एक डोस दिला आहे, ९२ टक्के ज्येष्ठ नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. १५ ते १८ वयोगटात ८३.७ टक्के लोकांना पहिला डोस तर ७२ टक्के नागरिकांना दोन्ही डोस दिले गेले आहेत. १२ ते १४ वयोगटात ८७.३ टक्के पहिला तर ६८.१ टक्के दुसरा डोस दिला गेला आहे. १८ वर्षे व त्यावरच्या २७ टक्के नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.