एसबीआयचे अध्यक्ष डी.के. खारा यांना मिळाल्या जिवे मारण्याच्या धमक्या, पोलिसांनी सुरू केला तपास


मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) चेअरमन दिनेश कुमार खारा यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तसेच बँकेचे नरिमन पॉइंट येथील मुख्यालय उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पाकिस्तानमधून कॉल करत असल्याचा दावा करत, या व्यक्तीने गुरुवारी सकाळी एसबीआयच्या मुख्य कार्यालयाच्या बोर्ड नंबरवर कॉल केला. बँकेने आठवडाभरात 10 लाखांचे कर्ज मंजूर न केल्यास चेअरमनचे अपहरण करून जीवे मारण्यात येईल, अशी धमकी दिली.

फोन करणाऱ्याने त्याचे नाव मोहम्मद झियाउल अलीम असे सांगितले. आठवडाभरात त्यांची मागणी पूर्ण न झाल्यास खारा यांनाच ठार मारणार नाही, तर महाराष्ट्र विधिमंडळ इमारतीच्या मागे असलेले एसबीआयचे मुख्यालयही उडवून देऊ, असे त्याने सांगितले. यानंतर एसबीआयने तत्काळ मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार केली, त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आला. पश्चिम बंगालमधील एका ठिकाणाहून हा कॉल ट्रेस करण्यात आल्याची माहिती आहे. कॉलरचा माग काढण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक राज्याच्या कानाकोपऱ्यात शोध घेत आहे.

अज्ञात व्यक्तीने केला फोन
पोलीस सूत्रांनी सांगितले की, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता एसबीआयच्या नरिमन पॉइंट कार्यालयाच्या लँड लाइनवर काही अज्ञात व्यक्तीने फोन करून अध्यक्षांना धमकी दिली. धमकी मिळाल्यानंतर बँकेने पोलिसांना घटनेची माहिती दिली, त्यानंतर मुंबई पोलीस सक्रिय झाले. स्टेट बँकेच्या तक्रारीच्या आधारे मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 506(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या महिन्यात झाली अध्यक्षपदी नियुक्ती
6 ऑक्टोबर रोजी दिनेश कुमार खारा यांची एसबीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी रजनीश कुमार यांची जागा घेतली आहे. केंद्र सरकारने दिनेश कुमार खारा यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी एसबीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.