सर्व 16 कर्णधार एकाच फ्रेममध्ये कैद, अॅरॉन फिंचने घेतला सेल्फी


आता T20 विश्वचषक सुरु होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. पहिल्या (पात्र) फेरीचे सामने 16 ऑक्टोबरपासून सुरू होतील. याआधी सर्व 16 संघांचे कर्णधार विश्वचषक ट्रॉफीसह एका फ्रेममध्ये दिसले. आयसीसीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरॉन फिंचनेही सर्व कर्णधारांसोबत सेल्फी काढला आहे.


पहिल्या चित्रात, गेल्या T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे कर्णधार ट्रॉफीच्या अगदी जवळ बसले आहेत. या दोन कर्णधारांच्या मागेच गेल्या वेळच्या उपांत्य फेरीतील पाकिस्तान आणि इंग्लंडच्या कर्णधारांना स्थान मिळाले आहे. छायाचित्रात डावीकडे भारतीय कर्णधार रोहित शर्मा बसला आहे.


त्यानंतर आयसीसीने अॅरॉन फिंचने घेतलेला एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये रोहित शर्मा फिंचच्या मागे उभा दिसत आहे. सर्व कर्णधारांच्या चेहऱ्यावर हास्य आहे.

नामिबिया विरुद्ध श्रीलंका सामन्याने होणार T20 विश्वचषकाची सुरुवात
रविवारी भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता नामिबिया विरुद्ध श्रीलंका सामन्याने टी-20 विश्वचषकाची सुरुवात होईल. यानंतर लगेचच नेदरलँडचा संघ यूएईशी भिडणार आहे. 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान 8 संघ एकमेकांशी भिडणार आहेत. या 8 पैकी 4 संघ सुपर-12 फेरीत प्रवेश करतील. सुपर-12 मध्ये आधीच 8 संघ आहेत. सुपर-12 चे सामने 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे.