निवडणूक आयोगाकडून घरच्या घरी मतदान सुविधा

हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका तारखेची घोषणा पत्रकार परिषदेत करतानाच मुख्य निवडणूक अधिकारी राजीवकुमार यांनी ‘डोर स्टेप व्होटिंग’ आणि ‘सी व्हिजील अॅप’ संदर्भात माहिती दिली. हिमाचल मध्ये १७ ऑक्टोबरला निवडणुकीची अधिसूचना जारी होत असून १२ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने नवी सुविधा यावेळी दिली असून ८० वर्षांवरील मतदार, दिव्यांग आणि कोविड चाचणी पॉझीटीव्ह आलेले मतदार घरातूनच मतदान करू शकणार आहेत. मागच्या निवडणुकीत काही ठिकाणी ही सुविधा दिली गेली होती. मात्र त्यावेळी नागरिकांनी अनेक शंका उपस्थित केल्या होत्या.

राजीव कुमार म्हणाले, यंदा घरून मतदान करणाऱ्या मतदाराचे व्हिडीओ शुटींग केले जाणार आहे. ज्यांना बूथ वर येऊन मतदान करणे शक्य नाही अश्या वरील प्रकारातील मतदारांना त्यासाठी अगोदरच फॉर्म १२ डी भरून द्यावा लागेल. देशात ८२ लाख दिव्यांग मतदार आहेत. ते बूथ पर्यंत येऊ शकले तर ठीक अन्यथा त्यांचे मत नोंदविण्यासाठी निवडणूक अधिकारी त्यांच्या घरी जातील. त्यापूर्वी तेथील उमेदवार, त्यांच्या एजंटला तशी कल्पना दिली जाईल म्हणजे ते मतदानाच्या वेळी उपस्थित राहू शकतील. सी व्हिजील अॅप विषयी माहिती देताना ते म्हणाले, जर कुणी उमेदवार अथवा त्यांचे समर्थक मतदानाच्या ठिकाणी काही गडबड, पैसे देणे किंवा दंडेलशाही करत असतील त्र कुणीही मतदाता त्याचे मोबाईल व्हिडीओ शुटींग करून ते पाठवू शकेल. पुढच्या १६ मिनिटात निवडणूक टीम जागी पोहोचेल आणि ९० मिनिटात या प्रकारावर काय कारवाई झाली यांची माहिती दिली जाणार आहे.

निवडणूक आयोग मतदान सुरळीत, मोकळ्या वातावरणात आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावे यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे.त्यानुसार वरील सुविधा दिल्या जात आहेतच पण त्याचबरोबर’नो युअर कॅन्डीडेट’  म्हणजे उमेदवाराचे केवायसी सुद्धा दिले जाणार असून त्याद्वारे उमेदवाराची क्राईम हिस्ट्री मतदार जाणून घेऊ शकणार आहेत.