आता तुम्ही सुद्धा घेऊ शकाल स्वतःचे विमान

केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे आता सर्वसामान्य माणूस सुद्धा स्वतःचे खासगी विमान घेऊ शकणार आहे. ‘फ्रॅक्शनल  ओनरशिप मॉडेल’ म्हणजे आंशिक विमान मालकी असे या योजनेचे नाव आहे. जगभरातील फार थोड्या धनाढ्य लोकांकडे स्वतःच्या मालकीची खासगी विमाने आहेत. असे भाग्य फारच थोड्यांना लाभते हेही खरे. शिवाय विमान खरेदी स्कूटर, कार खरेदी इतकी सोपी नाही. त्याची देखभाल, टॅक्सिंग साठी येणारा खर्च सुद्धा काही लाखात असतो. पण या नव्या योजनेमुळे कुणीही विमान मालक बनू शकणार आहे.

यात अनेक जणांना किंवा अनेक कंपन्या मिळून एक विमान खरेदी करू शकणार आहेत. एका विमानाला जास्तीतजास्त १६ मालक असतील. प्रत्येकाला किमान ६.२५ टक्के भागीदारी घ्यावी लागणार आहे. सध्या पाच वर्षासाठी ही पॉलिसी लागू केली गेली आहे आणि मालक व फ्रॅक्शनल कंपनीला तीन वर्षांचा करार करावा लागेल. कुणी किती पैसे गुंतवले त्यावर त्याला वर्षात किती तास विमानाचा वापर करता येणार हे ठरणार आहे. ही निवड तुमच्या पसंतीने होऊ शकणार आहे. शिवाय काही परवाने घेतले तर व्यावसायिक कारणासाठी सुद्धा हे विमान वापरता येणार आहे.

या योजनेमुळे पैशांची बचत होऊ शकेल शिवाय विमान देखभालीचा खर्च वाटून जाईल. स्वतःचेच विमान असल्याने विमान प्रवास अधिक सोपा आणि आपल्या वेळेनुसार करता येईल.