ऋषी सुनक पुन्हा ब्रिटीश पंतप्रधान रेस मध्ये?

युनायटेड किंग्डम मधून येत असलेल्या बातम्यांनुसार सत्ताधारी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे बंडखोर, पंतप्रधान लीज ट्रस यांना पंतप्रधान आणि पक्षनेतेपदावरून हटविण्याचे कारस्थान करत असून त्यात माजी अर्थमंत्री ऋषी सुनक आणि त्यांचे समर्थक सामील आहेत. यामुळे ऋषी सुनक पुन्हा एकदा पंतप्रधान रेस मध्ये आल्याचे म्हटले जात आहे. द टाईम्सच्या ‘युगव्ह’ पोल समोर टोरी पक्षाच्या अर्ध्याहून अधिक सदस्यांनी ट्रस यांची नेतेपदी केली गेलेली निवड ही चूक होती असे म्हटले आहे. या संदर्भात केल्या गेलेल्या सर्व्हेक्षणात गेल्या निवडणुकीत कन्झर्व्हेटिव्ह साठी मतदान करणाऱ्या ६२ टक्के मतदारांनी ट्रस यांची निवड करण्यात चूक झाल्याचे मत व्यक्त केले तर १५ टक्के मतदारांनी निवड योग्य असल्याचे मत व्यक्त केले होते. यामुळे टोरी सदस्यांनी संसदीय दलाच्या आतच अधिक व्होट मिळविण्यासाठी उमेदवार पर्याय विचार केला होता असा प्रवाद आहे.

गेल्या निवडणुकीत ४२ वर्षीय सुनक हेच लीज यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. त्यामुळे सुनक आणि या स्पर्धेत तिसऱ्या स्थानी असलेले हाऊस ऑफ कॉमन्स चे नेते पेटी मोर्डोंट यांची नावे पंतप्रधान पदासाठी पुन्हा पुढे आली आहेत.

ट्रस यांनी सत्तेवर येताच दिलेल्या करसवलती त्यांच्या अंगलट आल्या आहेत असे म्हटले जात आहे. त्यावर यु टर्न घेतला जाईल असा अंदाज असून त्यामुळे सादर केले गेलेले मिनी बजेट अडचणीत आले आहे. परिणामी नेता बदल होण्याची संभावना वाढली आहे. काही जाणकारांच्या मते मोर्डोंट यांना पंतप्रधान आणि सुनक यांना अर्थमंत्री केले जाऊ शकते. ट्रस हटाओ आंदोलनात सामील असलेले सर्व खासदार सुनक यांचे समर्थक आहेत असेही समजते.