सराफ बाजारात दणकून सोने खरेदी, एका दिवसात ३००० कोटींची झाली विक्री

गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या किमती वाढल्या असूनही करवा चौथ या सणादिवशी सराफ बाजारात देशभरात ३००० कोटीची सोने विक्री झाल्याचे समोर आले आहे. गतवर्षी याच दिवशी २२०० कोटींची सोने विक्री झाली होती. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) व देशातील छोट्या ज्वेलर्सची संघटना,ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार करोना काळात २०२० व २०२१ मध्ये करवा चौथ सराफी बाजारासाठी थंड होती. करोना निर्बंधामुळे ग्राहक घराबाहेर पडत नव्हते. पण यंदा सर्व निर्बंध दूर झाल्याने सणाच्या दिवशी ग्राहक खरेदीच्या मूड मध्ये आहेत. बाजारात सर्वत्र गर्दी आहे.

सोने चांदी दागिन्यांची दणकून खरेदी होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत सोने ३४०० रुपयांनी वाढले आहे तर चांदी प्रती किलो ११००० रुपयांनी घसरली आहे. सराफी बाजारात सोन्याचा सरासरी दर प्रती १० ग्राम ५२००० रुपये तर चांदी प्रती किलो ५९००० रुपये आहे. ज्वेलर्स संघटनेचे अध्यक्ष पंकज अरोरा म्हणाले यंदा हलके तसेच पारंपारिक, वजनाला जड, दागिन्यांचा भरपूर स्टॉक बाजारात आहे आणि दोन्हीला ग्राहकांची चांगली पसंती आहे. नवीन डिझाईनची मागणी सुद्धा मोठी आहे.

टीअर टू आणि टीअर थ्री शहरातून नेहमी प्रमाणे अंगठ्या, चेन, मंगळसूत्र यांना जास्त मागणी आहे. यावेळी धनत्रयोदशी, दिवाळी १४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या काळात साजरी होत असून त्यानंतर विवाह सिझन सुरु होत असल्याने बाजारात ग्राहकांची गर्दी आहे. पण जगभरातच सोने दरवाढ होईल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.